स्विस बँकेतील बेनामी खातेधारकांवर कारवाई; 50 हिंदुस्थानींना नोटीस

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्विस बँकांमध्ये बेनामी संपत्ती आणि खाती असणाऱ्यांवर दोन्ही देशातील सरकारने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. स्वित्झर्लंडमधील अधिकाऱ्यांनी याबाबत सुमारे 50 हिंदुस्थानी खातेधारकांची माहिती हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना देण्यासाठी प्रक्रियेला गती दिली आहे. तसेच या खातेधरकांना नोटीस पाठवून याबाबतचे स्पष्टीकरण मागवले आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर हिंदुस्थानला या खातेधारकांची माहिती देऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या खातेधारकांमध्ये जमीन व्यावसायिक, आर्थिक सेवा, औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक, इंजिनिअरिंग उत्पादनाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी काही खातेधारकांच्या बनावट कंपन्या असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

दोन देशांतील माहितीच्या आदानप्रदान करारातंर्गत ही माहिती देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर चोरांचा आश्रयदाता देश ही आपली प्रतिमा बदलण्यासाठी स्वित्झर्लंड सरकारने गेल्या काही वर्षापासून कायद्यात अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यासाठी विविध देशातील संशियत खातेधारकांची माहिती संबंधित देशांना देण्याच्या प्रक्रियेला स्विस सरकारने वेग दिला आहे. हिंदुस्थानात काळा पैशांचा विषय ऐरणीवर आला आहे. हिंदुस्थाननेही काळा पैसा आणि बेनामी स्विस खातेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. स्विस सरकारने 50 हिंदुस्थानी खातेधारकांना नोटीस पाठवून त्यांची माहिती हिंदुस्थानी सरकारला देण्याआधी स्पष्टीकरण देण्याची अंतीम संधी त्यांना दिली आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर त्यांची माहिती सरकारला देऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

खातेधारकांची गोपनीयता राखण्यासाठी स्विस बँकाची जगभरात ओळख आहे. त्यामुळे करचोरांचे आश्रयस्थान अशी स्विस बँकांची ओळख बनली आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी स्विस सरकारने माहितीच्या आदानप्रदान करारांतर्गत काही देशातील संशयित खातेधारकांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, स्विस बँकांनी खातेधारकांचे पूर्ण नाव न सांगता नावाची आद्याक्षरे, राष्ट्रीयत्व आणि जन्मतारीख यांची माहिती दिली आहे. स्विस बँकेकडून 21 मे रोजी 11 हिंदुस्थानींना नोटीस पाठवण्यात आली आहे. या खातेधारकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींना आवश्यक दस्तावेज आणि खात्यांशी संबंधित माहिती 30 दिवसांपर्यंत पाठवण्यात यावी, असे नोटीशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.