उत्तर कोरियाला भारी पडली क्षेपणास्त्र चाचणी

सामना ऑनलाईन । प्याँगयांग

अमेरिकेला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाला अखेर क्षेपणास्त्र चाचणी करणे भारी पडले. उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयांगपासून ९० मैलांवर असलेल्या तोकचोन शहराला क्षेपणास्त्र चाचणीची मोठी किंमत मोजावी लागली आहे.

बॅलिस्टिक हॉसाँग-१२ हे क्षेपणास्त्र चाचणी सुरू असताना तोकचोन शहरावर कोसळले. या दुर्घटनेमुळे नेमकी किती जीवित आणि वित्तहानी झाली याचे आकडे अद्याप हाती आलेले नाहीत. मात्र उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. याआधी मागच्या वर्षी (२०१७) २८ एप्रिल रोजी मध्यम गतीच्या बॅलिस्टिक हॉसाँग-१२ क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी झाली होती. त्यावेळी आकाशात असतानाच स्फोट झाला आणि क्षेपणास्त्राचे असंख्य तुकडे झाले होते. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाली.

तोकचोन शहराची लोकसंख्या २ लाख एवढी आहे. क्षेपणास्त्र दुर्घटनेमुळे शहरात किती प्रमाणात हानी झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ‘द डिप्लोमॅटिक’ मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, क्षेपणास्त्र कोसळल्याने शहरातील अनेक इमारती पडल्या असण्याची शक्यता आहे. मासिकाने अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आणि उपग्रहांमार्फत काढलेल्या छायचित्रांच्या आधारे तोकचोन बाबतचे वृत्त दिले आहे.

चाचणीसाठी क्षेपणास्त्र पुकेंग येथून डागण्यात आले. त्यानंतर ते ३८ किमी अंतरापर्यंत गेले. त्यावेळी ते ६९ किमी इतक्या उंचीवर होते. अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, चाचणीनंतर एका मिनिटातच क्षेपणास्त्राचे पहिल्या टप्प्याचे इंजिन बंद पडले आणि दुर्घटना झाली. मात्र उत्तर कोरियाचे सरकार अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत गुप्तता बाळगते त्यामुळे हानीबाबत नेमके आकडे हाती आलेले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या