आमच्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; उत्तर कोरियाचा दावा

कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातलेलं असताना उत्तर कोरियाने मात्र याबाबत अजबच दावा केला आहे. आमच्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, असं उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेला सांगितलं आहे.

उत्तर कोरियाचे म्हणणे आहे की, अद्याप त्यांच्या देशात कोरोनाचे एकही प्रकरण नोंदवण्यात आलेलं नाही. उत्तर कोरियाने 10 जूनपर्यंत 30 हजार लोकांची कोरोना चाचणी केली असल्याचं सांगितलं आहे. मात्र यात एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले असल्याचे उत्तर कोरियाचे म्हणणे आहे.

जगभरात आतापर्यंत 40 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात अजूनही कोरोनाची बरीच प्रकरणे समोर येत आहेत. डब्ल्यूएचओने मंगळवारी एका अहवालात असं म्हटलं आहे की उत्तर कोरियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 जून ते 10 जून या कालावधीत 733 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 149 लोक इन्फ्लूएन्झासारख्या आजार किंवा गंभीर श्वसन संसर्गामुळे ग्रस्त होते.

उत्तर कोरियात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याचा हा दावा खोटा असल्याचे अनेक तज्ज्ञचे म्हणणे आहे. तज्ज्ञांनी सांगितलं की, उत्तर कोरियाची आरोग्याची पायाभूत सुविधा फारच खराब आहे. तसेच हा देश चीनच्या सीमेला लागून असल्याने उत्तर कोरियात कोरोनाचा फैलाव झाला नसेल यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या