दिल्लीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थान आमच्या बापाचा! भाजप नेत्याचे विधान

प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनामध्ये झालेल्या गोंधळावरून विरोधी पक्ष केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस आणि शेतकरी नेत्यांनी यामागे राजकीय शक्तींचा हाथ असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

दिल्लीत झालेल्या गोंधळावरून टीव्ही डिबेट शो देखील रंगताहेत. विविध पक्षांचे प्रवक्ते, शेतकरी नेते यामुळे आमनेसामने आले आहेत. अशाच एका टीव्ही डिबेट शो दरम्यान शेतकरी नेते दिगंबर सिंह यांनी ‘दिल्ली कोणाच्या बापाची नाही’, असे म्हटले. या विधानावर भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि ‘फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थान आमच्या बापाचा, आजोबांचा असून त्यांनी या देशासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या आहेत’, असे म्हटले. ‘आज तक‘वर झालेल्या डिबेट शो मध्ये त्यांनी हे विधान केले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आंदोलनादरम्यान हिंसाचार

दिल्लीत प्रजासत्ताकदिनी आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलकांनी गोंधळ घातला. यादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारामध्ये 300 हून अधिक पोलीस जखमी झाले. यातील अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन या जखमी जवानांची चौकशी केली.

ज्या दिवशी सगळ्या शेतकर्‍यांना कायदा कळेल, त्या दिवशी सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी

आंदोलनात फूट

मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनात फूट पडली. राष्ट्रीय किसान मजदूर संघटना आणि भारतीय किसान युनियन (भानू) या दोन संघटनांनी शेतकरी आंदोलनातून माघार घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधत ते आमचे ऐकत नसल्याचाही आरोप केला.

37 नेत्यांवर एफआयआर दाखल

दिल्लीत झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच शेतकरी नेत्यांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. यामुळे या नेत्यांना परवानगी शिवाय आता देश सोडता येणार नाही. तसेच योगेंद्र यादव, मेघा पाटकर, राकेश टिकैत यांच्यासह 37 नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून यातील 20 जणांविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या