टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करणारच! हिंदुस्थानची युवा ऍथलीट हिमा दासचा विश्वास

296

गेल्या काही महिन्यांमध्ये रेसिंग ट्रकवर जबरदस्त कामगिरी करणारी हिंदुस्थानी युवा ऍथलीट हिमा दास हिला अद्याप टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करता आलेले नाही. मात्र यानंतरही तिला काडीमात्र टेन्शन नाही. याप्रसंगी ती म्हणते, ऑलिम्पिक पात्रता फेरीचा आताच विचार करीत नाही. कारण यामुळे विनाकारण टेन्शन वाढेल. टोकियो ऑलिम्पिक आता पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास माझ्याकडे एक वर्ष आहे. मी निश्चितच यासाठी पात्र ठरीन, असा ठाम विश्वास ढिंग एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱया हिमा दास हिने व्यक्त केला.

पाठीच्या दुखापतीमुळे 400 मीटर धावण्याच्या शर्यतीमधून माघार घेत यापुढे फक्त 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत धावणार का? असा सवाल केला असता ती म्हणाली, मी फिट होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 30 ते 40 दिवसांमध्ये आऊटडोअर ट्रेनिंगही करतेय, पण माझे प्रशिक्षक व ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून जो निर्णय घेण्यात येईल, त्याचा मी स्वीकार करीन, असे हिमा दास पुढे म्हणाली.
संध्याकाळी सायकलिंगचा आनंद

पतियाळा येथे राष्ट्रीय खेळाडूंच्या सरावाला सुरुवात झालीय. यावेळी ती म्हणाली, स्पर्धा सुरू व्हायला अजून वेळ आहे. त्यामुळे सरावावर जास्त मेहनत घेतली जात नाही. हलका सराव केला जात आहे. येथील वातावरणही उष्ण असल्यामुळे सकाळच्या सत्रात सराव केला जातो. संध्याकाळी मी सायकल चालवून आनंद घेते. तसेच क्रिकेटही खेळते. या खेळामध्ये मी गोलंदाजी करते.

स्पर्धांबाबत फेडरेशन निर्णय घेणार

ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून 12 सप्टेंबरपासून स्थानिक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण कोरोना कमी झाला नाही तर काय होणार याबाबत हिमा दासला विचारले असता ती म्हणाली, स्थानिक वेळापत्रकानुसार आम्ही सराव करीत आहोत. बहुतांशी राष्ट्रीय खेळाडू येथे आलेले आहेत, पण कोरोना कमी झाला नाही तर या स्पर्धा घ्यायच्या की नाहीत याबाबतचा अंतिम निर्णय ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचा असेल.

आपली प्रतिक्रिया द्या