आता माझ्या हातात काहीही नाही! आमदारांच्या सामूहिक राजीनाम्यावर गेहलोत यांची प्रतिक्रिया

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण, यावरून राजस्थान काँग्रेसमध्ये गदारोळ उडाला आहे. गेहलोत समर्थक आमदारांनी सचिन पायलट यांच्या नावाला तीव्र विरोध केला आहे. रविवारी तब्बल 80हून अधिक आमदारांनी थेट सामूहिक राजीनामा दिला.

या सामूहिक राजीनाम्यांवर अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांना फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आता माझ्या हातात काहीही नाही. मी गेली 40 वर्षं वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे. आता नवीन पिढीला संझधी मिळायला हवी, असे गेहलोत म्हणाले आहेत.

‘एक व्यक्ती, एक पद’ यानुसार गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सचिन पायलट यांच्याकडे सोपवावे असे हायकमांडला वाटते, मात्र गेहलोत समर्थक आमदारांचा त्याला तीव्र विरोध आहे. बंड करून पक्षात परतलेल्या कुणालाच मुख्यमंत्री करू नये, असा इशाराच त्यांनी काँग्रेस हायकमांडला दिला आहे. तसे झाल्यास सामूहिक राजीनामा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.

गेहलोत समर्थक आमदार माजी मंत्र्याच्या घरी

पायलट यांच्या दावेदारीमुळे असलेल्या नाराज समर्थक आमदारांनी माजी मंत्री शांती धारीवाल यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. आमच्याकडे 92 आमदार असून त्यापैकी 70 जणांनी विधानसभाध्यक्ष सी.पी. जोशी यांच्याकडे राजीनामा दिला आहे, अशी माहिती मंत्री प्रतापसिंह यांनी दिली.

…तर सरकार पडू शकते

मुख्यमंत्री गेहलोत यांचे सल्लागार अपक्ष आमदार संयम लोढा यांनी मोठे वक्तव्य केले असून मुख्यमंत्रीपदी गेहलोत यांनाच ठेवले पाहिजे. त्यांच्याकडील मुख्यमंत्रीपद काढले तर सरकार कोसळू शकते, असे लोढा म्हणाले.

माकन, खरगे यांच्या बैठकीकडे पाठ

काँग्रेसचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे हे सध्या जयपुरातील हॉटेलमध्ये असून त्यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र त्यांना अशोक गेहलोत भेटले, पण आमदार गेलेच नाहीत. त्यामुळे ही बैठकच रद्द करण्यात आली. त्यानंतर या तिघांनीही मुख्यमंत्री निवासस्थान गाठले. तेथे सचिन पायलट यांनी समर्थक आणि अपक्ष आमदारांसह या तिघांची बैठक घेतली.