विविध सण-उत्सवांवेळी होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागांच्या अधिकाऱ्यांना माहिती अधिकार, पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी नोटीस पाठवली आहे. याबाबत उपाययोजना, कारवाई या संदर्भात सात दिवसांत उत्तर देण्याची मागणी केली आहे; अन्यथा हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अनेक सण, उत्सव, महापुरुष यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक आरोग्य आणि ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांवर गंभीर परिणाम होतात. दरवर्षी कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांकडून दिले जाते; परंतु ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे.
विविध सणांदरम्यान वापरले जाणारे उच्च डेसिबल ध्वनिप्रणालींचा सततचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या उपकरणांमुळे निवासीय शांततेचा भंग होतो आणि गंभीर आरोग्य धोके निर्माण होतात. हियरिंग इम्पायरमेंट, वाढलेला ताण आणि पूर्वीच्या आरोग्यस्थिती असलेल्या व्यक्तीवर होणारे दुष्परिणाम यांचा उल्लेख मोरे यांनी तक्रारीत केला आहे.
रात्री ध्वनिपातळी 100 डेसिबल्सपेक्षा अधिक होते, जी परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त असते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस विभाग कायद्याची अंमलबजावणी करत नसल्याने त्वरित आणि कडक कारवाईची मागणी मोरे यांनी केली आहे. मॉनिटरिंग टीम्सची तैनाती, सूचना जारी करणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंड लागू करण्याची आवश्यकता असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे, नोटिसीत संबंधित अधिकाऱ्यांना 7 दिवसांत उत्तर देण्याची मागणी केली आहे. मोरे यांच्या वतीने ऍड. त्रुनाल टोणपे, ऍड. निकिता आनंदाचे, ऍड. ओंकार रासकर यांनी नोटीस दिली आहे.