वनक्षेत्रात अनधिकृत बांधकाम; नारायण राणे यांच्या पत्नीसह 30 जणांना नोटीस

1354

महाबळेश्वर तालुक्यातील अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकाम केल्याबद्दल नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह 30 मिळकतधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशावरून वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी ही नोटीस बजावली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामाबाबत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.

महाबळेश्वर येथील अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृतपणे बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या बांधकामांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात 2015 मध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यामध्ये संबंधित अनधिकृत बांधकामे अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये करण्यात आली असल्याने ती हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारचे आदेश सातारा जिल्हाधिकारी आणि वाईच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेबाबत सुनावणी होऊन हरित लवादाने 3 डिसेंबर 2019 रोजी आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांना खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार बजावलेल्या या नोटिशीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी बजावलेल्या नोटिशीमध्ये नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह 30 मिळकतधारकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या