कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा

22

सामना ऑनलाईन, कळवण

नापिकी, गारपीठ, अतिवृष्टी व पिकलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव या सर्व बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. हे कमी म्हणून की काय तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटींकडून पीककर्ज, अल्प मुदत व मध्य मुदत कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी नोटिसा देऊन तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून कोणत्याच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. हातउसनवारी व घरातील कारभारणीचे किडूकमिडूक विकून यंदाच्या हंगामात बियाणे घेऊन पेरणी केली होती. मात्र पीक हातात आल्यावर कांदा, मका, गहू, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला सर्वच शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्च निघणेही दुरापास्त झाले आहे. सक्तीची कर्जवसुली केल्यास शेतकरी आत्महत्येत वाढ होणार आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता विविध कार्यकारी सोसायटींमार्फत होणारी सक्तीची कर्जवसुली तत्काळ थांबवून सरसकट कर्ज व कृषी लाईट बिल माफी करावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या