नाणारच्या माळरानावर संघर्षाचा अंगार

32

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

जिंकू किंवा मरू…आता जीव गेला तरी बेहत्तर…माघार नाहीच! नाणारवासीय पेटून उठले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर नाणारच्या माळरानावर संघर्षाचा अंगार फुलला. शब्द देऊन विश्वासघात करणाऱया सरकारविरोधात नाणारवासीयांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. हा संताप केवळ रत्नागिरीच नव्हे, तर कोकणच्या कानाकोपऱयात संघर्ष पेटवेल असे भयंकर चित्र दिसू लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्येच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. नाणारवासीयांनी त्याचे जोरदार स्वागत केले. पण पाठीत खंजीर खुपसणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला. त्यातच अधिसूचना रद्द होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरले आणि नाणारवासीयांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रखरखीत उन्हात नाणारच्या माळरानावर सरकारच्या नावाने प्रत्येकाने शिव्यांची लाखोली वाहिली. शाप देत बोटे मोडली. त्याबरोबरच आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही असा पक्का निर्धार करत आणखी तीव्र संघर्षासाठी मुठी वळल्या.

नाणारमधील वातावरण तापले आहे. शिवसेनेचा भक्कम पाठिंबा लाभल्याने ग्रामस्थांना प्रचंड मानसिक बळ मिळाले आहे. प्रस्तावित रिफायनरीविरोधातील भविष्यातील लढा कदाचित रक्तरंजित होणार अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तसे झाल्यास कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊन त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहणार असल्याने सरकारदरबारीही याची गंभीर दखल घेतली जात आहे. पोलीस आणि संबंधित अधिकाऱयांना नाणारमधील हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश सरकारने दिल्याचे सूत्रांकडून समजते.

आपली प्रतिक्रिया द्या