नवी रक्तचाचणी ठरवणार वेदनेची तीव्रता

55

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

मानवी शरीरातील वेदनांचे अचूक मापन करणारी नवी रक्त चाचणी आता अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली आहे. रक्तातील अणूंची आणि सुश्म कणांची अवस्था अभ्यासून एखाद्या अवयवात उद्भवलेल्या वेदनेची तीव्रता किती आहे हे या चाचणीतून स्पष्ट होणार आहे. वेदनेची तीव्रता लक्षात आल्यामुळे आता डॉक्टर किती प्रमाणात आणि कोणते वेदनाशामक रुग्णाला द्यावे याचा अचूक अंदाज घेऊ शकणार आहेत. त्यामुळे वेदनाशामक औषधांच्या अनावश्यक आणि धोकादायक वापराला चाप बसणार आहे.

इंडियाना विद्यापीठाचे प्राध्यापक अलेक्सान्डर निकुलेस्कू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी रक्त चाचणी डॉक्टर आणि रुग्ण दोघांसाठीही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वी रुग्ण सांगेल त्या प्रमाणात त्याला वेदना होत असल्याची समजूत डॉक्टर करून घ्यायचे. नंतर अंदाजाने रुग्णाची वेदना थांबवण्यासाठी त्याला वेदनाशामक (पेनकिलर) औषधांचा डोस द्यायचे. या ट्रीटमेंटमध्ये अनेकदा अफू, कोकेन अथवा हेरॉईनसारख्या उत्तेजकांचा वेदनाशामक म्हणून वापर व्हायचा. अशा वापरामुळे रुग्णाच्या शरीराला अशी पेनकिलर घेण्याची सवय जडण्याचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता होती. आता मात्र मानवी शरीरातील वेदनेचे स्वरूप आणि तीव्रता समजल्यामुळे डॉक्टरांना वेदनाशामक औषधांचा अतिवापर रोखता येणार आहे.

– बायोमार्करच्या मदतीने वेदनांचे मापन
मधुमेहामध्ये रक्तातील ग्लुकोज हा विकाराची तीव्रता ठरवणारा बायोमार्कर मानला जातो. ग्लुकोजच्या प्रमाणावरून रक्तात साखर किती वाढली आहे त्याचा अंदाज घेऊन इन्सुलिन रुग्णाला दिले जाते. त्याच धर्तीवर अमेरिकन संशोधकांनी शरीराच्या वेदनेचे मोजमाप करणारा रक्तातील नवा बायोमार्कर शोधला आहे. त्याच्या मदतीने डॉक्टरांना रुग्णाला होणाऱया वेदनांचे मापन करून वेदना मिटविण्यासाठीच्या औषध योजना करता येतील, असेही प्राध्यापक निकुलेस्कू यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या