सहकार विभागात आता कंत्राटी उपनिबंधक, आयुक्त कार्यालयाने सेवानिवृत्तांकडून मागवले अर्ज

राज्याच्या सहकार विभागात आता कंत्राटी तत्त्वावर (करार पद्धतीने) उपनिबंधकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी सहकार आयुक्तांनी कंत्राटी उपनिबंधकांच्या नियुक्तीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱयांकडून अर्ज मागवले आहेत. उपनिबंधकांच्या रिक्त जागा भरण्याऐवजी सहकार विभागाकडून कंत्राटी तत्त्वावर अशी पदे भरली जाणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्यभरात तालुका आणि जिल्हास्तरावर सहकार विभागाची कार्यालये असून तेथे जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधकांची अनेक पदे आहेत. त्यापैकी उपनिबंधकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सदरच्या पदांवर वर्षानुवर्षे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱयांना पदोन्नती देऊन ती भरणे अपेक्षित होते. तसेच सरळसेवेनेही ही पदे भरणे गरजेचे अवश्यक आहे. मात्र सहकार विभागाकडून तसे न करता पहिल्या टप्प्यात एक पद करार पद्धतीने भरण्यासाठी सेवानिवृत्त उपनिबंधकांकडून अर्ज मागवले आहेत.

65 वर्षांपेक्षा कमी वय हवे 

65 वर्षांपेक्षा जास्त वय नसलेल्या सेवानिवृत्त उपनिबंधकांनी अर्ज करता येणार आहेत. त्यांना सरकारच्या डिसेंबर 2016 च्या मानधनाच्या तरतुदीनुसार वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे. याआधी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी तयार केलेल्या निवडणूक प्राधिकरणात अनेक अधिकाऱयांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे.