आता आवाजावरूनही होणार रोगाचे निदान, संशोधन सुरू

कोणताही आजार ओळखायचा असेल, तर त्यासाठी रक्त किंवा इतर वैद्यकीय चाचण्यांच्या आधारावर आतापर्यंत डॉक्टर आजाराचे निदान करत होते. आजारांचे निदान करण्याच्या या यादीमध्ये आता आवाजाचाही समावेश झाला आहे. तुमच्या आवाजाच्या मदतीने तुम्हाला कोणता आजार आहे, हे शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे.

सध्या विविध क्षेत्रात तंत्रज्ञानचा वापर होत आहे. दररोज नवनवे शोध लागत असतात. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संशोधक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करत असतात. याचाच एक भाग म्हणून आता एखाद्याच्या आवाजावरून रोग शोधण्याच्या तंत्रज्ञानावर संशोधक संशोधन करत आहेत. याकरिता संशोधक एक डेटाबेस तयार करत आहेत. ज्याचा उपयोग मानवी आवाज ऐकून होणारा आजार शोधण्यासाठी केला जाईल. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य होणार असून अल्झायमरपासून कर्करोगापर्यंतच्या निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे.

माणसाच्या आवाजावरून आजाराचा शोध लावण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्याप्रमाणे रक्त किंवा इतर वैद्यकीय चाचण्यांच्या मदतीने आजाराचे निदान केले जाते, त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णाच्या आजाराचा शोध लागणार असल्याची माहिती, या विषयावर काम करणाऱ्या संस्थांनी दिली आहे.

तसेच या तंत्रज्ञानाबाबत कार्य करणारे प्राध्यापक ऑलिवियर एलिमेंटो यांनी सांगितले की, एखाद्या रुग्णाचा व्हॉईस डेटा हा सगळ्यात स्वत आणि सहज उपलब्ध होणारा डेटा आहे शिवाय कोणत्याही रुग्णाची माहिती गोळा करण्याचा हा सर्वात सुलभ मार्ग आहे तसेच या तंत्रज्ञानासाठी आवाजाची माहिती गोळा करण्याचा सर्वोत्तम मार्ग अजून संशोधकांना सापडलेला नाही, अशी माहिती प्राध्यापक येल बेन्सौसन दिली आहे.

हे तंत्रज्ञान कसे काम करणार ?
याकरिता आवाजाचे डेटाबेस तयार करण्यात येईल. याकरिता संशोधकांनी एक नवे अॅप विकसित करण्यास सुरुवात केली आहे. ज्याद्वारे रुग्णाच्या आवाजाचे नमुने गोळा करण्यात येतील. समजा एखाद्याला पार्किन्सन्सचा आजार असेल तर अशा व्यक्तिचा आवाजाची  लय मंद असेल. आवाजाद्वारे आजाराचे निदान करताना रुग्णाला अॅपवरील काही ओळी वाचून दाखवाव्या लागतील. त्या आवाजाच्या आधारे आजार ओळखता येईल, यावेळी रुग्णाच्या आजाराबाबत गोपनियताही पाळली जाईल, असेही संशोधकांनी सांगितले आहे.