‘मग भाजपाला आता दरोडेखोर म्हणायचं का? ‘

77
anil-parab

सामना ऑनलाईन,मुंबई

पारदर्शकतेच्या मुद्दावर युती तुटली हे सांगणाऱ्या भाजपाला पारदर्शकतेवर बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणत शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. मुंबईमध्ये परब यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी भाजपा सरकारची सुरूवातच अपारदर्शकतेपासून झाली आहे असं सांगितलं. शिवसेनेने सरकारला पाठींबा देण्याच्या भाजपाचे सरकार अस्थिर होते. त्यावेळीस त्यांनी बहुमत सिद्ध कसं केलं, असं कोणतं डील केलं हे जनतेला कळालं पाहीजे असं अनिल परब म्हणाले.

अनिल परब यांनी भाजपाच्या ताब्यात असलेल्या नागपूर महापालिकेत गंभीर घोटाळे झाल्याचं स्पष्टपणे सांगितलं.नागपूरमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ओसीडब्लू कंपनीसोबत करार करण्यात आला होता. ही कंपनी कोणाची आहे ? पाणीपट्टी वाढवली पण नागपूरकरांना २४ तास पाणी का मिळत नाही ? असे प्रश्न परब यांनी उपस्थित केले आहेत. हा नागपूरकरांच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे, मग भाजपाला दरोडेखोर म्हणायचं का असा प्रश्नही अनिल परब यांनी उपस्थित केला.

नागपूर महानगरपालिकेत अनेक घोटाळे झाले, मग असं असताना भाजपाला फक्त मुंबई महानगरपालिकेतच पारदर्शकता का गरजेची वाटत आहे असं अनिल परब यांनी विचारलं आहे. मुंबईतील खड्ड्य़ाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपाच्या ताब्यात असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या ताब्यातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचं ते म्हणाले. याच मुद्दावरून १९ ऑगस्ट २०१६ ला परब यांनी नागपूरच्या महापालिका आयुक्तांना एक पत्र दिलं होतं. ज्यात नियमबाह्य पद्धतीने रस्त्यांची कामं करणाऱ्या, रस्त्यावरील खड्ड्यांना जबाबदार कोण याची चौकशी करून अहवाल सादर करावा अशी विनंती केली होती. मात्र आजपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही असं परब यांनी सांगितलं.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या