थिएटरमध्ये खा बिनधास्त घरचे कुर्रम कुर्रम

133

सामना ऑनलाईन। ठाणे

थिएटरमध्ये बसून पॉपकॉर्न खात नाटक, सिनेमा पाहण्याचा आनंद काही औरच. पण हे पॉपकॉर्न किंवा खाद्यपदार्थ केवळ थिएटरमधीलच खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून घेणे सक्तीचे केले जाते. किंबहूना पाण्याची बाटली व खाद्यपादार्थ घेऊन येण्यास गेटवरच रोखले जाते. त्यामुळे तिकिटापेक्षा खाण्यापिण्याचाच खर्च जास्त होतो. मात्र आता बिनधास्त तुम्ही घरातून आणलेले पॉपकॉर्न, स्नॅक्स कुर्रमकुर्रम  खाऊ शकता आणि तुम्हाला कुणी रोखल्यास १८००२२२३६५  या टोल फ्री क्रमांकाकर  थेट संपर्क साधून तक्रारही करू शकता.

हॉटेल्स किंवा इतर ठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या दर्जा किंवा भेसळीबाबत १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकाकर संपर्क साधता येऊ शकतो. तसेच छापील विक्री दरापेक्षा जास्त किंमत किंवा अवाजवी दर, चुकीचे वजन आढळल्यास तक्रार करण्यासाठी लवकरच नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र कार्यालयाची ही हेल्पलाइन २४ तास सुरू ठेवण्याचा मानस असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

कुठल्याही मॉल, चित्रपटगृह, नाटय़गृह याठिकाणी बाहेरून खादय़पदार्थ आणि पाणी आणण्यास सर्रास बंदी घातली जाते.  त्यामुळे २० ते ४० रुपये दराने मिळणाऱया पाण्याच्या बाटलीसाठी शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागतात. कोक, पेप्सीचा एक ग्लास पन्नास ते साठ रुपयाला मिळतो. पॉपकॉर्न तर भलताच भाव खातो. एक पॉपकॉर्नचे पाकीट ४० ते थेट शंभर रुपयांपर्यंत मिळते. समोसा ६० रुपये. आईसक्रीम, केक, पेस्ट्रीचा भावही वधारलेलाच असतो. त्यामुळे कुटुंबासोबत नाटक, सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसते. मॉलमध्येही हीच परिस्थिती आहे. मात्र तसा कोणताच कायदा किंवा नियम अस्तित्वातच नाही. ग्राहक यासंदर्भात अनभिज्ञ असल्याचा फायदा घेत मल्टीफ्लेक्स, थिएटरवाले त्यांची गेली अनेक वर्षांपासून लुबाडणूक करत असल्याची भांडाफोड खुद्द ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी ठाण्यात एका बैठकीत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या