धोकेबाज NRI पतीच्या संपत्तीवर येणार गदा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानातील महिलांसोबत लग्न करून त्यांना धोका देऊन विदेशात पळून जाणाऱ्या अनिवासी हिंदुस्थानी (एनआरआय) पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा घटना रोखण्यासाठी केंद्र सरकार कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत आहेत. फसव्या एनआरआय पतींच्या संपत्तीवर आता गदा आणण्याच्या विचारात आहे.

विदेशातील तरुण हे हिंदुस्थानातील तरुणींना विदेशात घेऊन जाण्याचं आणि आकर्षक उच्चदर्जाच्या जीवनशैलीचे आमीष दाखवतात आणि त्यांच्या सोबत लग्न करतात. त्यासाठी मुलीच्या घरच्यांकडून मोठा वेगवेगळ्या पद्धतीने हुंडाही घेतला जातो. परंतु लग्नानंतर हे एनआरआय पती त्यांच्या सोबत गैरव्यवहार व छळ करून त्यांना सोडून पळ काढतात. अशा फसव्या विदेशी पतींच्या विरोधात सरकार आता कठोर नियम लागू करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनूसार एनआरआय पतीला आधी वेबसाईटच्या माध्यमातून समन्स दिला जाणार आहे. त्यानंतर या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल. समन्स दिल्यानंतर ही एनआरआय पतीने याबद्दल काही उत्तर दिलं नाही तर त्याला आरोपी म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसंच त्याची संपत्ती जप्त करून पासपोर्ट रद्द केला जाईल अशा पर्यायांचा विचार यामध्ये करण्यात आला आहे. जोपर्यंत तो आरोपी पती न्यायालयात हजर होत नाही तोपर्यंत त्याची संपत्ती मिळणार नाही असा पर्याय देखील यामध्ये विचारात घेण्यात आला आहे, असेही यामध्ये म्हटलं आहे. या बैठकीस महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी, कायदे मंत्री रविशंकर प्रसाद, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हजेरी लावली.

दरम्यान, या आधीही हिंदुस्थानातील तरुणींबरोबर लग्न करून विदेशात पळून जाणाऱ्या पतीला रोखण्यासाठी नियम काढला होता की, जर एनआरआयशी लग्न केल्यास ४८ तासांच्या आधी लग्नाची नोंद करणे बंधनकारक राहील. तसे न केल्यास पासपोर्ट, व्हिसा जप्त केला जाईल.