हिंदुस्थान आणि पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची गुप्त बैठक

24

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पाकड्यांनी ‘हम नही सुधरेंगे’ चा जप चालू ठेवत दहशतवादाचं झाड रोज वाढवण्यासाठी खतपाणी घालणं सुरू ठेवलंय. हे पाकडे सुधारतील अशा आशेवर असलेल्या हिंदुस्थानने त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून दहशतवाद थांबवण्यासाठीचे प्रयत्न अजूनही सुरू ठेवले आहेत. २६ डिसेंबरला बँकॉकमध्ये हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकचे लेफ्टनंट जनरल नासेर खान जंजुआ यांच्यात बैठक झाली. इतर बैठकांप्रमाणे याही बैठकीमध्ये पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याबद्दल खडे बोल सुनावले. या गुप्त बैठकीबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले असता त्यांनी ही बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

ज्या दिवशी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीसोबत भेट झाली त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी ही भेट झाली. जाधव यांच्या पत्नी आणि आईला दिलेल्या वाईट वागणुकीचा निषेध करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली नव्हती तर ही भेट पूर्वनियोजित होती, ज्यामध्ये  पाकपुरस्कृत दहशतवादावर विस्ताराने चर्चा व्हावी हा हिंदुस्थानचा उद्देश होता असं परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दहशतवाद आणि पाकसोबत चर्चा हे समीकरण जुळत नसलं तरी डीजीएमओ ,बीएसएफ किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या पातळीवर पाकच्या याच पदावरील अधिकाऱ्यांशी चर्चा होऊ शकते असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकांप्रमाणे भविष्यातही बैठका होऊ शकतात असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

डोवाल आणि जंजुआ यांच्यात झालेल्या बैठकीत हिंदुस्थानने दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्यांना पाकच्या लष्कराकडून मिळत असलेलं प्रोत्साहन याबाबत नाराजी व्यक्त केली. तर पाकने कश्मीरमधल्या असंतोषाबाबत नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. हिंदुस्थानने मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा दहशतवादी हाफीज सईद नजरकैदेतून मुक्त होणे,त्याने राजकीय पक्ष सुरू करणे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लश्कर-ए–तोयबाच्या म्होरक्या झकी-उर-रेहमान लख्वीला जामीन दिला जाणे ही देखील हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब असल्याचं या बैठकीत आपल्यातर्फे सांगण्यात आलं.

बैठकीतील इतर तपशील गुप्त ठेवण्यात आला आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून पाकने हिंदुस्थानसोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं  सांगितलं जात आहे. हिंदुस्थानातील पाकचे उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांनी यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, उद्योगमंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आणि परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. २०१५ साली जेव्हा हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची लाहोरमध्ये भेट झाली होती तेव्हा संबंध ताणले गेले तरी तोडायचे नाहीत असं ठरवलं होतं. सातत्याने होणाऱ्या या भेटी, बैठका त्यामुळेच होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या