ICC Ranking जडेजाची चमकदार कामगिरी, अष्टपैलूंच्या यादीत पोहोचला अव्वल स्थानी

आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी (Icc Test Ranking) जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत हिंदुस्थानातील रवींद्र जडेजा अव्वल स्थानी आहे. जडेजा आता 386 गुणांसह जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनला आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डर 384 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स 377 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

जडेजा व्यतिरिक्त आणखी एक हिंदुस्थानी खेळाडू रविचंद्रन अश्विन 353 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर पाचव्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल (338) हसन आहे. अश्विनने गोलंदाजांच्या क्रमवारीत 850 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स यांच्याकडून 58 गुणांनी मागे आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पॅट कमिन्स 908 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.

फलंदाजीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे?

फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाच स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली 814 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तसेच न्यूझीलंडचा केन विल्यमसन (886) आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन (878) अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (797)) पाचव्या क्रमांकावर असून हिंदुस्थानी जोडी ऋषभ पंत आणि रोहित शर्मा 747 गुणांसह संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या