कोरोना संकटानंतर ताज महालला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ

कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला असून जगभरातील पर्यटन ठप्प झाले आहे. तसेच कोरोना संक्रमणाच्या भीतीने अनेकजणांनी आपले पर्यटनाचे बेत रद्द केले आहेत. तर काहींनी पर्यटनाचे बेत पुढे ढकलले आहेत. देशभरात अनलॉक सुरू झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. आता देशभरात काही प्रमाणात पर्यटनही सुरू होत आहे. त्यात ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहून या क्षेत्राला उभारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना संकटानंतर ताज महाल पर्यटकांसाठी खुला केल्यावर पहिल्याच शनिवारी पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी आलेल्या पर्यटकांच्या संख्येपेक्षा शनिवारी 50 टक्के जास्त पर्यटकांनी ताजमहालला भेट दिली आहे. ताज महाल 21 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. शनिवारी 3079 पर्यटकांनी ताजमहालला भेट दिली. त्याचप्रमाणे आग्रा किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. या किल्ल्याला 480 हिंदुस्थानी तर 10 परदेशी नागरिकांनी भेट दिली. अकबर का मकबरा, फत्तेहपूर सिक्री, सिंकदरा, रामबाग या पर्यटन ठिकाणानांही पर्यटक भेट देत आहेत.

कोरोना संकटानंतर ताज महाल पर्यटकांसाठी खुला केल्यानंतर दररोज अडीच हजारांपर्यंत पर्यटक येत आहेत. या संख्येत आणखी वाढ होण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच शनिवारी वाढलेल्या पर्यटकांमुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ताज महालला भेट देणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने परिरातील पर्यटन उद्योगालाही नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या