आई नावाचा योद्धा! कोरोनाची तमा न बाळगता नर्सने केलं महिलेच्या बाळाला स्तनपान

2538

कोरोना नावाच्या संकटाला परतवण्यासाठी देशभरातले कोरोना योद्धे निकराने प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे रोजच्या जगण्यातही अनेक प्रश्न निर्माण होत असताना कोलकाता येथे मात्र माणुसकीचं सुंदर चित्र पाहायला मिळालं आहे. कोरोनाची तमा न बाळगता एका नर्सने रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेच्या तान्हुल्याला स्तनपान केलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरजी कर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातील ही घटना आहे. इथे प्रसूती कक्षात उमा अधिकारी नावाच्या परिचारिका कर्तव्यावर होत्या. त्यांना आठ महिन्यांचा मुलगा आहे. त्या कक्षात प्रसूतीसाठी एक महिला दाखल झाली होती. तिची सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली होती. त्यामुळे तिला आपल्या नवजात तान्हुल्याला दूध पाजता येत नव्हतं. दुसरीकडे बाळही भुकेने टाहो फोडत होतं.

या कक्षात अन्यही काही महिला प्रसूत झाल्या आहेत. मात्र, त्यांच्यापैकी कुणीही कोरोनाच्या भीतीने दूध पाजायला तयार झालं नाही. पण, अधिकारी यांनी मात्र हिंमत दाखवली. या महिलेची तळमळ आणि बाळाचा टाहो ऐकून अधिकारी यांनी त्या बाळाला पदराखाली घेत स्तनपान केलं. बाळाला दूध पाजताना त्यांनी सुरक्षेची सर्व खबरदारीही घेतली होती. ‘मला त्या बाळाचं रडणं ऐकवलं नाही आणि मी त्याला दूध पाजण्याचा निर्णय घेतला’, असं मत उमा अधिकारी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या