रुग्णवाहिकेत डॉक्टरऐवजी एसी मेकॅनिक पाठवला, रुग्णाचा मृत्यू

55
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । कोलकाता

रुग्णवाहिकेत डॉक्टरऐवजी एसी मेकॅनिक पाठवल्यामुळे रुग्णालयात जात असलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगाल येथील बीरभूम इथे ही घटना घडली असून अरिजीत असं या मयत मुलाचं नाव आहे.

बीरभूम येथील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय अरिजीत दास याची बोर्डाची परीक्षा सुरू होती. सोमवारी त्याचा पहिला पेपर होता. मात्र, परीक्षेच्या एकच दिवस आधी त्याला अचानक ताप यायला लागला. त्यानंतर दोन दिवस होऊनही त्याचा ताप तसाच होता. दोन दिवसांनी त्याला कमरेत दुखू लागलं. त्यामुळे अरिजीतला त्वरित नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्या छातीत दुखायला सुरुवात झाली आणि त्याची तब्येत आणखी गंभीर झाली. त्यामुळे त्याला कोलकात्यातील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी नर्सिंग होमकडून एक रुग्णवाहिका मागवली.

रुग्णवाहिकेचे ८ हजार आणि सोबतच्या डॉक्टरचे ८ हजार असे मिळून १६ हजार रुपये अरिजीतच्या घरच्यांनी नर्सिंग होममध्ये जमा केले. त्यानंतर रुग्णवाहिका पुरवण्यात आली. मात्र, अरिजीतसोबत कुठल्याही नातेवाईकाला रुग्णवाहिकेत बसवण्यात आलं नाही. त्यांना वेगळं वाहन करून कोलकात्याला येण्याबद्दल सांगण्यात आलं. दुर्दैवाने कोलकात्याच्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच अरिजीतचा मृत्यू झाला.

या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी रुग्णवाहिकेचा चालक आणि डॉक्टर या दोघांनाही ताब्यात घेतलं. डॉक्टरची चौकशी करत असताना त्याने आपण डॉक्टर नसून एसी मेकॅनिक असल्याचं कबूल केलं. पोलिसांनी नर्सिंग होमवर हलगर्जीपणाबद्दल गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या