‘वजनदारांचं’ जग

95
सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे.

<< दिलीप जोशी>>  n [email protected]

दिवस थंडीचे आहेत. उत्तर ध्रुव पुरता गोठला. उत्तर हिंदुस्थानही बर्फाची चादर पांघरून आहे. आठवडय़ापूर्वीच आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च थंड हवेचं ठिकाण असलेलं महाबळेश्वर कमालीचं गारठलं. वेण्णा तलावावर हिमकण पसरले. नाशिक-निफाडचं तापमान कमालीचं खाली आलं आणि एरवीही थंडी अनुभवणारं नागपूर थंडीने लपटेलं. एकूण सुखद ते झोंबरा गारवा अनुभवताना साठी ओलांडलेले म्हणू लागले ‘आमच्या वेळी पडायची तशी थंडी आहे बरं का यंदा!’ हा लेख लिहीत असताना मुंबईसुद्धा बऱयापैकी गारठा अनुभवते आहे आणि पुण्यातल्या हिंजेवाडी परिसरातल्या इमारती पहाटे धुक्याच्या पडद्याआड गडप होतायत.

प्रदूषण नसेल तर थंडीसारखा सुखकारक, आल्हाददायक मोसम नाही. हिवाळय़ाचा हंगाम म्हणजे पाऊसपाणी उत्तम झाल्यावर चांगल्या पिकांचा, ताज्या भाज्यांचा आणि फळफळावळीचा. यावर्षी देशात या सगळय़ाचं गणित बऱयापैकी जमलंय. महाराष्ट्रात मराठवाडय़ासह सगळीकडे पाऊस उत्तम झालाय. पाणी चांगले आहे आणि त्यातच थंडीने कहर केलाय.
हिवाळय़ाचा असा आविष्कार जाणूनच संक्रांतीच्या सणाला तिळगुळाची योजना असते. सौर कॅलेंडरनुसार येणारा हा एकमेव सण. पारंपरिक तिळगुळाबरोबरच थंडी घालवणारे अनेक पदार्थ बाजारात येतात. आल्याच्या वडय़ा, उडीदपाक किंवा सुक्या मेव्याचे लाडू. पूर्वी हे सारे पदार्थ घरी व्हायचे. आता मालामॉल झालेल्या बाजारात ठायीठायी दिसतात.
सात अब्ज माणसांची वस्ती अवघ्या पृथ्वीवर आहे आणि त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे हजारो शाकाहारी, मांसाहारी पदार्थ २४ तास रांधले जातात. त्याचा आस्वाद घेणारे जगभर असतात. जगातल्या सगळय़ा ‘खाऊगल्ल्या’ दणकून धंदा करतात. मोठमोठय़ा ‘फूड कोर्ट’पासून अगदी टपरीवजा जागेत मिळणारे चवदार पदार्थ चाखण्यासाठी जगातल्या लोकांची गर्दी उसळते.

खिशात (किंवा इ-वॉलेटमध्ये) पैसे, जिभेला चव असल्यावर पोटभर किंवा त्याहूनही जास्तच अन्न फस्त करण्याचा मोह कुणाला आवरतोय. त्यात माणसांच्या जगात आग्रह नावाचा प्रकार असतो. इतर प्राणीमंडळी त्यांच्या संमेलनात एकमेकांना खाण्यापिण्याचा आग्रह करत नसावीत. आपल्या एका भुकेला पुरेसे दाणे टिपले की ती समाधानी असतात. मांसाहारी प्राणीसुद्धा भूक नसताना खात नाहीत. पण माणसांचं जगच निराळं. त्यांची भूक जगावेगळी.
परिणाम काय? उत्तर सोपं आहे. वजनदार माणसांची संख्या एका खाद्य अभ्यासानुसार जगातील साडेपाच अब्ज माणसं अवाजवी वजनाची आहेत. प्रत्येक व्यक्तीचं वय आणि वजन यांचं एक आरोग्य गणित असतं. त्याचं तंतोतंत पावन होणं शक्य नाही. पण ‘लठ्ठ’ म्हणण्याइतपत वजनवाढ होऊ नये याबाबत जगाने जागरूक राहावं असं वैज्ञानिक म्हणतात.
वाढत्या वजनाची जाणीव ज्यांचं वजन वाढत असतं त्यांना नसते असं बिलकूल नाही. ‘कमी खाल्लं पाहिजे बरंच वजन वाढलंय’ असं म्हणत अनेकजण अनेक पदार्थांचा आस्वाद घेत असतात. ‘कळतं पण वळत नाही’ अशी त्यांची स्थिती असते. मग जगात वयाच्या तुलनेत योग्य वजन असलेल्यांची संख्या किती आहे? अभ्यासकांच्या मते फक्त १४ टक्के.
अर्थात याच जगातल्या अनेक भागात सतत दुष्काळाचा सामना करावा लागणारी आणि सतत कुपोषित राहिलेली माणसंही आहेतच. त्यातील बऱयाच जणांना अन्नधान्याच्या वितरण पद्धतीमधल्या ढिसाळपणामुळे अर्धपोटी राहावं लागतं. ग्लोबलायझेशनच्या काळात जगातल्या प्रत्येक माणसाला गरजेपुरतं अन्न, वस्त्र्ा आणि निवारा मिळाला तरी खूप. परंतु प्रगत जगातही भरपूर विषमता आहेच.

मात्र लठ्ठपणाचीही मर्यादा ओलांडून स्वतःच्या आरोग्याला त्रास होईल अशी अतिलठ्ठपणाची समस्या जवळपास साडेतीन अब्ज लोकांना सतावत आहे. लठ्ठपणाची ही ‘साथ’ वेगाने पसरली तर जगातली बहुतेक माणसं बाळसेदार होतील.
खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी खावं हा तात्त्विक चर्चेचा मुद्दा होईल. आपलं आरोग्य अबाधित राहील एवढं खाद्य जगातल्या प्रत्येक माणसाला मिळालंच पाहिजे. परंतु असं माणसाच्या इतिहासात कधीकाळी घडलं असेल तर ठाऊक नाही. ज्यांना भरपेट किंवा त्यापेक्षाही जास्त मिळतं त्यांनी क्षणभर विचार करावा असा इशारा नवं संशोधन देतं.
फास्ट आणि फॅट फूड लवकर लोकप्रिय होते. आपल्यालाही चमचमीत खायला आवडतं पण जीभ आणि पोट यांचं फारसं सख्य नसतं. आवडीचे पदार्थच अनेकदा नकोसे विकार आणतात. लठ्ठपणामुळे चालण्याफिरण्यावर मर्यादा येतात. मजेत जगण्याचा एक भाग म्हणून अन्नावर ताव मारणं ‘मजा’च घालवत असेल तर काय उपयोग? यावर उपाय भरपूर खा, पण भरपूर व्यायामही करा. थंडीचे दिवस त्यासाठी उत्तम. मात्र लठ्ठपणा ही ‘जेनेटिक’ (वारसागत) देणगी असेल तर थोडी काळजी घ्या. सुग्रास घास प्रत्येकाला मिळावा, पण त्याने आरोग्याचा घास घेऊ नये एवढीच अपेक्षा.

आपली प्रतिक्रिया द्या