ठसा : पं. शांताराम चिगरी

38

>> अभय मिरजकर 

लातूर जिह्यातील संगीत क्षेत्राची ओळखच पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्या नावाने होती. 15 एप्रिल 1939 रोजी कर्नाटकातील किजापूर जिह्यातील खैनूर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते विरगंटीअप्पा, तर आईचे नाव होते विरम्मा. घरात अठराविश्वे दारिद्र्य होते. वयाच्या 8 व्या वर्षी देवीच्या साथीमध्ये शांताराम यांना अंधत्व आले अन् त्यांच्या जीवनातील प्रकाशच संपला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती, संगीत ऐकण्यासाठी ते आपल्या मित्रांसोबत ग्वालगीरच्या यात्रेत गेले आणि तिथून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली. यात्रेत मित्रांची साथ सुटली. एका ट्रकमधून ते विजापूरला दाखल झाले. विजापूरच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागून पोटाची आग शांत केली. पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यांची रवानगी मुंबईच्या रिमांड होममध्ये करण्यात आली. चार दिवस रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी दादरच्या अंध शाळेत करण्यात आली. त्यांना कन्नड भाषेशिवाय इतर कोणतीच भाषा येत नव्हती. तिथे त्यांनी मराठी, हिंदी भाषा शिकण्यास सुरुवात केली. ब्रेल लिपीच्या माध्यमातून सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच संगीताचे शिक्षणही घेतले. त्यातच ते अधिक रमले.

ग्वाल्हेर घराण्याचे पं. नारायणराव व्यास यांनी तिथे विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर गायकी शिकवली. शांताराम यांचा स्वर पक्का होता, परंतु ताल कच्चा होता. त्यामुळे त्यांना तबला शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला. बनारस घराण्याचे पं. बद्रीप्रसाद मिश्रा हे दादरच्या अंध शाळेत शनिवार आणि गुरुवारी तबला शिकवण्यासाठी येत होते. त्यांच्याकडून शांताराम यांनी तबल्याचे शिक्षण घेतले. मुंबई येथे झालेल्या तबला वादन स्पर्धेत शांताराम चिगरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर लखनौ येथे त्यांनी केवळ ‘धाधातिट’ वाजवून स्पर्धा जिंकली. यादरम्यान त्यांनी मुंबई सोडली आणि कोलकाता गाठले. फरुखाबाद घराण्याचे श्रेष्ठ कलावंत उस्ताद अहमदजान थिरकवली यांच्याकडून त्यांनी तबल्याचे शिक्षण घेतले. पुढे दिल्ली घराण्याचे खलिफा उस्ताद नत्थूखाँ यांच्याकडूनही काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. गुजरातमधील पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून पुन्हा ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले. पं.विनायकबुवा पटवर्धन (पुणे) यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या केवळ 14 व्या वर्षी त्यांनी प्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांच्यासोबत तबला साथसंगत केली. अनेक मान्यवरांसोबत त्यांनी साथसंगत केली.

1954 मध्ये त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रात नोकरी केली. प्रारंभी केवळ वाद्ये सुरात लावून देण्याचेच काम त्यांना दिलेले होते. प्रसिद्ध गायिका बेगम अख्तर, नूरजहाँ यांच्यासोबत त्यांनी साथसंगत केली. आकाशवाणीत नोकरीस असताना त्यांचा मंगेशकर कुटुंबीयांशी जवळचा संबंध आला. त्यांच्यासोबत तबला, ढोलकीची साथसंगतही शांताराम गुरुजींनी  केली. ‘हमदर्द’, ‘अलबेला’ या हिंदी चित्रपटांत तसेच ‘साखरपुडा’ या मराठी चित्रपटात त्यांनी तबला व ढोलकीची साथसंगत केली. पुढे आपली जन्मभूमी खैनूरला परतले. उदगीर तालुक्यातील बोळेगाव येथील शकुंतलादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला, त्याही जन्मजात अंध होत्या. पुढे लातूर येथे त्यांनी 1973 मध्ये सूरताल संगीत विद्यालयाची स्थापना केली. राज्यभर त्यांचा शिष्यवर्ग निर्माण झालेला आहे. अर्थात मराठवाड्याच्या संगीत क्षेत्रातील हा मेरुमणी सदैव उपेक्षितच राहिला. प्रसिद्धीपासून कायम दूर असणारे पं. शांताराम चिगरी यांना कर्नाटक सरकारने कलाश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले, तर 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्य सांस्कृतिक पुरस्कार दिला. अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या वतीने नुकतेच त्यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संगीतासाठी आयुष्य वेचणारे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या