स्मृतिगंध – मिश्कील मधुसूदन

>>  प्रदीप निफाडकर

मधुसूदन नानिवडेकर याच्या जाण्याने गझल हा कवितेचाच एक प्रकार आहे, असे समजणाऱयांच्या संख्येत घट झाली.  गझल हा सुंदर काव्यप्रकार कृत्रिम करण्यात आणि फेसबुकवरच्या शंभर लाईकमध्ये यशाचे मोजमाप करणारे बक्कळ गझलकार आहेत. पण गझलचा ढाचा समजून घेऊन कवितेपासून तिला दूर जाऊ न देण्याची कोशीश करणारे जे हाताच्या बोटावर मोजता येतील असे गझलकार आहेत त्यात मधुसूदन एक होता. आता नव्या मधुसूदनची वाट मराठी गझलेचे क्षेत्र पाहत आहे… असा गझलकार निर्माण होणे, हीच मधुसूदनला खरी श्रद्धांजली ठरेल.

मधुसूदन नानिवडेकर यांच्या जाण्यामुळे मराठी गझल प्रांताचे नुकसान झाले आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या पहिल्या फळीतील शिष्यांपैकी तो एक होता. पण नंतर त्याने स्वतःची वाट शोधण्याचा प्रयत्न केला. थोडा थोडा तो यशस्वी होत असताना कधी त्याची मिश्किली डोके वर काढायची तर कधी त्याच्या कोकणातलेच काही कवी त्याला त्रास देत. कधी त्याची आर्थिक परिस्थिती तर कधी प्रकृती त्यात भर घालत होती. या कोरोना काळात अमरावतीच्या कविता डवरेसारखे गझलकार व काही स्वतःला गझलकार समजणारे अनेक जण गेले. आता या बातम्या येणार नाहीत, अशी मनाची समजूत घालत असतानाच मधुसूदन गेला. आता त्याच्या जाण्याने सारे संपले, उरल्या फक्त काही कविता, काही शेर.

काही माणसांना भेटून पश्चाताप होतो, काहींना भेटायचे राहिले अशी हुरहूर राहते, तर काहींना एकदाच भेटून जन्मभर न बोलताच एकमेकांवर प्रेम करीत राहतो. मधुसूदन तिसऱया श्रेणीतला होता. त्याची व माझी भेट एक-दोनदाच झालेली. एका भेटीत त्याने मला आदरपूर्वक (तसे त्याने त्या संग्रहावर लिहिले आहे) त्याचा संग्रह दिला. त्याला माझ्याबद्दल असणारा आदर व्यक्त करायला भेटीची किंवा गुळगुळीत, गुळमुळीत शब्द वापरायची गरजच नव्हती. त्याचे माझ्याप्रति असणारे प्रेम, आदर मला कुठून कुठून कळत राही. कधी त्याचा पुतण्या अमितकडून तर कधी माझा कोल्हापूरचा शिष्य प्रताप पाटीलकडून. एकदा गोव्याच्या एका कवयित्रीने त्याला विचारले होते, “निफाडकरांसारखीच तुम्ही गझल लिहिता ना?’’ तेव्हा त्याने  “नानिवडेकरांसारखे दोनचार लोक निफाडकर नाश्त्याला खातात,’’ असे म्हणत उत्तर दिले होते. आदर व्यक्त करायलाही त्याने नवे शब्द शोधले होते. मला केवळ माझ्याबद्दलचा आदर किंवा प्रेमच कळत नव्हते तर त्याच्या गझलांबद्दल, त्याच्या साधेपणाबद्दलचे किस्सेही कळत होते. पत्रकार असूनही डोक्यात हवा न गेलेला, त्याहुनी जास्त गझलकार असूनही डोक्यात हवा न गेलेला मधुसुदन एक वेगळंच व्यक्तिमत्त्व होतं. कधी कधी एखाद्या माणसाच्या जास्त भेटी झाल्या नाहीत याचे दुःख होत नाही. उलट अशा भेटी न झाल्याने आपण केवळ त्याच्या साहित्यावर लिहू शकतो याचा आनंदही होतो. नाहीतर भेटलेल्या माणसाच्या स्वभावावर, त्याच्या चुकांवर आणि त्याच्या प्रकरणांवरच आजकाल जास्त लिहिले जाते. निखळ साहित्यावर कमी लेखन होते. त्यामुळे मधुसूदनबद्दल लिहायचे तर त्याच्या साहित्यावर लिहायचे, हे मी ठरवलेले आहे.

मला त्याचे आवडणारे शेर बरेच आहेत. त्याने गझलेत प्रयोग केलेले काही शेर आहेत. काही शेर नक्कीच फसले आहेत; पण काही भन्नाट झाले आहेत. अशा शेरांची यादी दिली तरी हा लेख पूर्ण होईल. पण थोडे त्याच्या कुटुंबाबद्दल सांगितलेच पाहिजे. त्याला कवितेचा वारसा त्याच्या पालकांकडून मिळाला होता. त्याची आई श्लोक-अभंग म्हणवून घ्यायची, वडील भाषेचा डौल राखावा कसा ते सांगायचे. त्याचे भावांवर खूप प्रेम होते. त्याच्या भावाची पंच्याहत्तरी झाल्यावर त्याने लिहिलेला लेख मला अमितने पाठविला होता. तो वाचून मधुसूदन व त्याच्या भावाने गरिबीत पण हसत हसत दिवस कसे काढले ते कळत होते. कोकणाने मराठी कवितेच्या समृद्धीत भर घातली आहे, याची जाण मधुसूदनला सतत असायची. कोकणावरचे त्याचे प्रेम सतत बोलण्यातून झिरपायचे. कोकणातील पर्यटनाबद्दल जरी लिहायचे म्हटले तरी त्याची लेखणी बोलू लागे –

रम्य  किनारे बुलंद किल्ले ही कोकणची दौलत आहे

पर्यटकांनो खुशाल यावे सहर्ष हार्दिक स्वागत आहे 

त्याला कोकणाबद्दलचा दुराभिमान नव्हता. त्याच्या गझलाच काय कविताही नीट वाचल्या तर कळेल त्यात कोकणी शब्द फार आलेले नाहीत. उगाचच कोकणी न कळणारे शब्द घालून गझल लिहिण्याचा प्रयत्न करणारे काही गझलकार माझ्या माहितीत आहेत. मधुसूदन त्यात वेगळा होता. इथेच त्याचे वेगळेपण जाणवते. कोकणातल्या काही कवींनी त्याला निनावी पोस्ट टाकून त्रास दिल्याची एकच घटना नाही, अनेक आहेत. विशेष करून गझलविरोधी भांडण-कांडण करणाऱयांनी या मृदू माणसाविरुद्ध एक फळीच उभी केली होती. तरीही तो लिहीत होता. त्या विरोधाला तो जुमानत नव्हता असे नाही. पण त्याचा स्वभाव गरीब असल्याने तो दुर्लक्ष करीत होता. परिस्थितीने शिकू न दिल्याचा एक न्यूनगंड त्याच्यात होता.

मी त्यांची स्तुती केली,
त्यांनी विषय रंगवला

मी माझ्या भाकरीचा ऊर्फ बेकारीचा विषय काढला

त्यांनी विषय बदलला

अशा ओळी त्याच्याकडून उगाचच लिहिल्या गेल्या नव्हत्या. एखादा कलावंत वृत्तपत्रात नोकरीला असला की बाकीची वृत्तपत्रे त्याची दखल घेत नाहीत, हा माझा अनुभव त्याच्याही गाठी होता.

मी लिहू शकणार नाही आत्मवृत्ताचे रकाने

तेवढा आहे कुठे साधासुधा इतिहास माझा 

अशा ओळी त्याची साक्ष देतात. त्याने गझलेमध्ये काही प्रयोग केले. त्यातील एक म्हणजे साधारणतः गझलेत कवी आपले नाव किंवा टोपणनाव वापरतो, त्या शेराला मक्त्याचा शेर म्हणतात. मधुसूदनने –

चांदण्यात या आलीस इथवर हरकत नाही

चंद्र गवसला पुनवेनंतर हरकत नाही

घडय़ाळात पाहिले तिने अन् समजून गेलो

निघावयाला ‘‘नानिवडेकर’ हरकत नाही

असे आडनावच आणले.

मला त्याचे काही आवडलेले शेर ऐका

दिवाळी तुझ्याही घरी आज आहे

शुभेच्छेस संधी बरी आज आहे

क्षितिजाच्याही पल्याड आहे गाव तुझे तू सुखी रहावे

असेल तेथे लहरत वारा असेल बरसत माझा श्रावण

घरात माझ्या चंद्र आज वावरतो आहे

म्हणून कोणी सुप्रभातही म्हटले नाही

मधुसूदन मिश्कील होता, त्याचा एक नमुना पहा –

प्रेमरसाच्या लिपीत लिहिले त्याच्यासाठी गाणे

अक्षर माझे कसले ते तर केवळ केविलवाणे

असे प्रेमावर सुंदर लिहिल्यावर त्याच्यातील पत्रकार कसा जागा होतो आणि मिश्कीलपणे लिहितो –

प्रेम डबघाईला येत आले तरी चालवूया महामंडळासारखे

कोकणाकडून गझलेला फार अपेक्षा होत्या, आहेत. आता नव्या मधुसूदनची वाट मराठी गझलेचे क्षेत्र पाहत आहे… असा गझलकार निर्माण होणे, हीच मधुसूदनला खरी श्रद्धांजली ठरेल.

(लेखक ज्येष्ठ गझलकार आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या