शिक्षकांनो… सावधान! सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्यास निलंबन

27

सामना प्रतिनिधी । पुणे

राज्यातील शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्हांतर्गत आणि प्रशासकीय बदल्यांच्या धोरणांसंदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रिया आणि उलटसुलट टीका करणाऱ्या शिक्षकांनी सावधान राहावे. अशा प्रतिक्रिया देणे हे प्रशासनाच्या धोरणाविरोधात शिक्षकांना भडकावणारे ठरवून प्रसंगी अशा शिक्षकांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. सध्या शिक्षक सचिव आणि संचालकांच्या कार्यालयातूनच अशा पोस्टवर करडी नजर ठेवली जात आहे.

राज्य सरकारने शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचे धोरण जाहीर केले आहे. त्यासाठी जिल्हाबाह्य बदल्यांकरीता प्राथमिक शिक्षकांना पसंतीची २० ठिकाणे द्यायची आहेत. बदलीसाठी ठरविण्यात आलेले नियम आणि निकष याबद्दल शिक्षक संघटना, त्यांचे पदाधिकारी, शिक्षक हे फेसबुक, व्हॉट्सअपद्वारे प्रतिक्रिया देत आहेत. त्यामध्ये शिक्षण आणि ग्रामविकास सचिवांपासून ते मंत्रालयापासून एनआयसी शिक्षण संचालक आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर त्यामध्ये टाकला जात आहे. त्याचा शोध घेऊन सध्या कारवाया सुरू आहेत.

एका शिक्षकाने सगळ्या संघटना मिळून जिल्हा परिषदांपुढे उपोषण करू या, अशी पोस्ट सांगलीत एका ग्रुपवर टाकली. त्याची दखल घेत न्यायालयाचा अवमान आणि प्रशासन धोरणाविरुद्ध भडकविल्याबद्दल संबंधित शिक्षकाला सांगलीत कारवाईची शोकॉज नोटीस बजावण्यात आली. ग्रामविकास खाते एनआयसी शिक्षकांच्या मुळावर उठले आहे. काय, आणखी, किती शिक्षकांचे बळी घेणार? असे व्हॉट्सअपवर म्हणणाऱ्या शिक्षकाला शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली. तुम्हाला निलंबित करून विभागीय चौकशी का करण्यात येऊ नये, असे नमूद करून सांगलीतील एका संघटनेला आणि संस्थेला खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्अपवर अशीच तिखट प्रतिक्रिया देणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकाला मंत्रालयातून सूचना देऊन निलंबित करण्यात आले होते. राज्यात आतापर्यंत ४० ते ४५ शिक्षकांना पेâसबुक आणि व्हॉट्सअप पोस्टप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसा बाजवण्यात आल्याची एका शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. ५ ते ६ शिक्षक आजपर्यंत निलंबित झाले आहेत. वरून सूचना असल्याने जिल्हा परिषदांचे शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे नीट बाजू ऐकून न घेता कारवाया करत असल्याने शिक्षक सध्या प्रशासनाच्या दहशतीखाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या