महीलांविषयी आक्षेपार्ह पोस्ट: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे टाकळी ढोकेश्‍वर येथील कार्यकर्ते महेश झावरे यांच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या महिला  आघाडीच्या वतीने सध्या तालुक्याच्या विविध भागात सध्या जागर स्त्रीशक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे फेसबुकवरून थेट प्रक्षेपण करण्यात येत असून टाकळीढोकेश्‍वर येथील अशाच कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुरू असताना महेश झावरे यांनी आक्षेपार्ह कमेंट केली. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदीका मेघना झुझम यांचा खेळ महिलांचा  आवडीचा या कार्यक्रमाचे या जागरामध्ये आयोजन करण्यात येत  असून त्यादरम्यान गाण्यावर नृत्य करणाऱ्या महिलांवर झावरे यांनी कमेंट केली होती.

सोशल मिडीयावर झावरे यांची कमेंट आल्यानंतर तालुक्यात त्या विरोधात शिवसैनिकांमध्ये संतापाच्या प्रतिक्रीया उमटू लागल्या. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही संताप व्यक्त करीत शुक्रवारी सकाळी एकत्र येत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची भेट घेऊन झावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, पदाधिका-यांची तक्रार दाखल होण्यापूर्वीच पोलीस निरीक्षक पोवार यांनी टाकळीढोकेश्‍वर येथे झावरे यांना या प्रकाराबददल समज दिली होती.

महिला आघाडीप्रमुख उमा बोरूडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात डॉ. वर्षा पुजारी, डॉ. पद्मजा पठारे, सुवर्णा डोळ, सुनिता आहेर, मंगल तारडे, सुनिता मुळे, भारती औटी, सुनिता निमसे, जयश्री जेउरकर, सुनिता झावरे, सुनिता बोरूडे, संध्या शेळके यांचा समावेश होता. निरीक्षक पोवार यांनी महेश झावरे यांच्याविरोधात कठारे कारवाई करावी  जेणेकरून पुन्हा महिलांवर वाईट कमेंट करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. शिवसेनेच्या महिला संयमी आहेत. मात्र यापुढील काळात अशा प्रकारे महिलांवर अशा प्रकारच्या कमेंट करण्या आल्या तर जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे उमा बोरूडे यांनी सांगितले. शिष्टमंडळाशी बोलताना निरीक्षक पोवार यांनी अशा पोष्ट करणारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे अश्‍वासन देत यापुढे कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याने आक्षेपार्ह पोष्ट न करण्याचे अवाहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या