गुढीपाडव्यानिमित्त पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैजनाथ मंदिरात अलंकारिक महापूजा

देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले परळीतल्या प्रभु वैजनाथ मंदिरात आज अलंकारिक महापूजेची आरास मांडण्यात आली. नववर्षाच्या प्रथमदिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभु वैजनाथाला अलंकारिक पूजेने सजवले आहे. वार्षिक उत्सवामधील ही पहिलीच पूजा असल्याने पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

गुढीपाडव्यानिमित्त प्रभू वैजनाथाला दागिन्यांची सजावट करण्यात आली आहे. या अलंकारिक पूजेच्या रूपाने नेत्र दीपून जात आहेत. कांतीपुरी, वैजयंतीक्षेत्र, जयंतीक्षेत्र, प्रभाकर क्षेत्र,पर्यली ही परळी वैजनाथाची प्राचीन नावे आहेत. जगाच्या उद्धारासाठी भारतभूमीत शिवलिंग अवतरले. वायूच्या संघर्षाने या ज्योतिर्मय स्वरुपाचे बारा भाग होऊन ते इतस्ततः विखुरले तीच आज प्रसिद्ध असलेले ज्योतिर्लिंगे होत असा उत्पत्तीविषयी ‘परळी महात्म्य’ या प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे. श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून वर्षभरात गुढीपाडवा, विजयादशमी, मकरसंक्रांती, महाशिवरात्री या सणांच्या दिवशी अलंकारिक महापूजेची आरास केली जाते.