पावसाची एक्झिट; आता प्रचारात सतावणार ऑक्टोबर हीट

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर अखेर सोमवारपासून पावसाने अधिकृत एक्झिट घेतली. आणखी आठवडाभर तो रेंगाळणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले. परंतु आता ऑक्टोबर हीट राज्यात पाहुणचार घेणार असून उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा अक्षरशः घामटा निघणार आहे. त्याचा ट्रेलरही तिने दाखवायला सुरुवात केली आहे. मंगळवारी मुंबई, ठाण्यात सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. पारा 30 ते 32  डिग्री सेल्सियस असला तरीही अंगातून घामाच्या धारा आणि उन्हाचे चटके असे वातावरण आहे.

पावसाने संपूर्ण सप्टेंबर महिना मुक्काम केला. अर्धा सप्टेंबर झाल्यानंतर पाऊस काढता पाय घेतो; परंतु यंदा नवरात्रातही त्याने दांडिया घातला. नऊ दिवस तो पडतोय की काय असे वाटत असताना आता त्याने टाटा-बायबाय केले आहे. 4 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होईल. या प्रचारात उमेदवारांना आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या अटींबरोबरच कार्यकर्त्यांच्या सोयीसुविधाही पहाव्या लागणार आहेत.

दसरा आणि प्रचाराचा धडाका

दसर्‍याच्या मुहूर्तावर अनेक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. सणासुदीचा मोका साधून ते मतदारांना साद घालतील. 8 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. त्यानंतर ऑक्टोबर हीटची काहिली आणखी वाढेल. त्यामुळे या कडक उन्हात प्रचार करण्याचे उमेदवारांपुढे आव्हान असणार आहे.

2014 च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती 

2014च्या विधानसभा निवडणुकीतही ऑक्टोबर हीटने उमेदवारांना हैराण केले होते. त्या वेळीही हीच परिस्थिती होती. कार्यकर्त्यांना उन्हातान्हात फिरून प्रचार करावा लागला होता. फेटे, टोप्या, उपरणी यांमुळे आणि थंडगार पाण्याच्या बाटल्यांमुळे कार्यकर्त्यांना काय तो थोडाफार दिलासा मिळाला होता.

  • उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी उमेदवारांना प्रचार सभा सायंकाळनंतरच घ्याव्या लागणार.
  • अधूनमधून पावसाचा हलका शिडकावा होईल असा अंदाज आहे; परंतु दोन दिवसांपासून कडक उन्हाचा मुक्काम आहे
  • मुंबईत 34 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद
  • उन्हाची काहिली आणखी वाढत जाणार आहे

म्हणून वाढली उन्हाची काहीली

मुंबई, ठाण्यातून पाऊस जवळपास गायबच झाला आहे. तर अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेशच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे कडक उन पडते आहे. दरम्यान, मुंबईसह ठाण्यात अधुनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या