बायकोने परवानगी दिल्याने नवऱ्याने केले तृतीयपंथीयाशी लग्न, तिघे एकाच घरात राहणार

ओडिशामध्ये एका तरुणाने तृतीयपंथीयाशी लग्न केलं आहे. आश्चर्याची बाब ही आहे की या लग्नाला या तरुणाच्या पहिल्या बायकोने परवानगी दिली आहे. लग्नानंतर हे तिघेजण एकाच घरात राहणार आहे. यामुळे या लग्नाची कालाहांडीत जोरदार चर्चा सुरू आहे. तृतीयपंथीयाशी लग्न करणाऱ्या तरुणाला पहिल्या बायकोपासून एक मुलगा देखील आहे. या तरुणाचं गेलं वर्षभर तृतीयपंथीयाशी प्रेमप्रकरण सुरू होतं. आपल्या नवऱ्याचं तृतीयपंथीयाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचं कळाल्यानंतर त्याच्या बायकोने त्याला दुसरं लग्न करण्याची परवानगी दिली. कायदेशीररित्या घटस्फोटाशिवाय पती दुसरं लग्न करू शकत नाही.

अजय(बदलेलं नाव) आणि मनोरमा (बदलेलं नाव) यांचे नरला भागात असलेल्या एका मंदिरात लग्न पार पडले. यावेळी बरेच तृतीयपंथी या लग्नसमारंभात सामील झाले होते. सेबकारी किन्नर महासंघाच्या अध्यक्ष कामिनी यांनी मनोरमा हिचे कन्यादान केले. आम्ही अजय आणि मनोरमा यांच्यासाठी खूश आहोत असं कामिनी यांनी म्हटले आहे. त्यांनी या दोघांच्या सुखी समाधानी आयुष्यासाठी प्रार्थनाही केली आहे. अजय याचं प्रीता(बदललेलं नाव) हिच्यासोबत आधीच लग्न झालं होतं. या दोघांचं लग्न झालेलं असताना अजय आणि मनोरमा यांचं लग्न कसं होणार हा प्रश्न सेबकारी किन्नर महासंघाला पडला होता. प्रीताने लग्नाला संमती दिल्याने आमची चिंता मिटली असं कामिनी यांनी म्हटलं आहे.

पोलीस अधीक्षक गंगाधर मेहर यांनी या घटनेबाबात बोलताना म्हटले की या लग्नाविरोधात आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाहीये. जर तक्रार आली तर आम्ही कायद्यानुसार कारवाई करू. ओडिशातील वरिष्ठ वकील त्रिलोचन नंदा यांनी सांगितले की पहिले लग्न कायदेशीररित्या रद्द झाल्याशिवाय दुसऱ्या लग्नाला मान्यता दिली जाऊ शकत नाही. असा संबंधांना आपण विवाहबाह्य संबंध किंवा लिव्ह इन रिलेशनशिप म्हणू शकतो, मात्र कायदेशीररित्या अजय आणि मनोरमा यांच्या नात्याला नवरा-बायकोचे नाते म्हणता येणार नाही.