Odisha Railway Accident – अपघाताचे कारण समजले, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

ओडीशातील बालासोर येथील बाहानगर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघाताचे बचाव कार्य पूर्ण झाले आहे. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून या भयंकर अपघाताचे दृश्य पाहून देशातील अवघी जनता सुन्न झाली आहे. रेल्वे अपघात रोखण्यासाठी सर्व मार्गांवर अॅण्टी ट्रेन कोलीसन सिस्टिम अर्थात ‘कवच’ बसविणार अशी घोषणा मोदी सरकारने केली होती त्यामुळे हा अपघात कसा झाला असा सवाल केला जात आहे. दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताचे कारण समोर आले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

”या अपघाताचे मूळ कारण समजले आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग मध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला. त्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही प्रसिद्ध करू. तसेच अपघातासाठी जबाबदार व्यक्तींची देखील ओळख पटवली गेली आहे.  ट्रॅक पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरू आहे. घटनास्थळावरून बचाव कार्य पूर्ण झाले असू सर्व मृतदेह हटविण्यात आले आहे. बुधवारपर्यंत या मार्गावरील सेवा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत”, असे वैष्णव यांनी सांगितले.