
ओडिशात भीषण रेल्वे अपघात घडला आहे. बालासोर येथे बाहानगर रेल्वे स्टेशनवर बंगळूरु-हावडा सुपरफास्ट एक्प्रेस आणि शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे डब्बे रुळावरून घसरले आणि मालगाडीवर धडकले. या विचित्र अपघातात किमान 50 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 350 वर जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
हा भयंकर अपघात सायंकाळी 6.51 ते 6.55 या दरम्यान घडल्याची माहिती रेल्वेच्या खरगपूर विभागाने दिली आहे. सुरुवातीला कोरोमंडल एक्प्रेस आणि मालगाडी एकाच ट्रकवर समोरासमोर धडकल्याचे वृत्त होते. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या रुळांवर डब्बे घसरल्यामुळे अपघात झाल्याचे रात्री उशीरा जाहीर केले. सायंकाळी 6.51 वाजता बंगळूरूहून हावडाकडे जाणारी सुपरफास्ट एक्प्रेसचे डब्बे घसरले आणि बाजूच्या रुळावर आलेल्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसवर हे डब्बे आदळले. यामुळे सायंकाळी 6.55 वाजता कोरोमंडल एक्प्रेसचेही डब्बे घसरले आणि मालगाडीवर धडकले. हा अपघात एवढा भिषण होता की, कोरोमंडल एक्प्रेसच्या डब्यांचा चेंदामेंदा झाला.
अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकले असून, रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरु होते. मात्र, बाहानगर स्टेशनवर प्रकाश व्यवस्था अपुरी आहे. अंधारामुळे बचावकार्यात अडथळा येत होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकांसाठी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
वंदे भारतच्या उद्घाटनाचा आजचा कार्यक्रम रद्द
ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर, गोव्यात मडगाव येथे शनिवार, 3 जूनला होणारा वंदे भारतच्या उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली.