Odisha Train Accident भीषण रेल्वे अपघातात 233 प्रवासी ठार, 900 हून अधिक जखमी

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बाहानगर रेल्वे स्टेशनवर बंगळूरु-हावडा सुपरफास्ट एक्प्रेस आणि शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे डब्बे रुळावरून घसरले आणि मालगाडीवर धडकले. रेल्वे दुर्घटनेला अनेक तास उलटून गेले तरीही बचाव आणि मदतकार्य सुरूच आहे.

ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रेल्वे दुर्घटनेनंतर तेथील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्य स्थापना दिनाचा सोहळा रद्द करत एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी मदत आणि बचाव पथके हजर असून बचावकार्य सुरु आहे. काही जखमी प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि बालासोरच्या आसपासच्या सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दोन्ही गाड्यांच्या किमान 12 बोगी रुळावरून घसरल्या आणि किमान 4 बोगी रेल्वे रुळापासून दूर फेकल्या गेल्या. सुपरफास्ट ट्रेनच्या उलटलेल्या डब्यांमध्ये आणखी अनेक लोक अडकल्याची भीती आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. अपघातानंतर हेल्पलाइन क्रमांक (67822 62286) जारी करण्यात आला आहे.

ओडिशातील रेल्वे अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मदत जाहीर केली आहे. वैष्णन यांनी ट्विट केले आहे – ‘ओडिशातील या दुर्दैवी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये दिले जातील.’