ओडिशा रेल्वे अपघातात 288 मृत्यू! अवघा देश सुन्न!! रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी

ओडिशात बाहानगर बाजार स्टेशन येथे झालेल्या शतकातील सर्वात भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या 288 वर गेली असून एक हजारांवर प्रवासी जखमी आहेत. अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. या भयंकर अपघाताचे दृश्य पाहून देशातील अवघी जनता सुन्न झाली आहे. ‘न्यू इंडिया’, ‘देश आगे बढ रहा है’, म्हणजे हेच का? प्रवाशांच्या जिवाची काळजी कोण घेणार? असे प्रश्न जनता मोदी सरकारला विचारत आहे. दरम्यान, रेल्वेच्या ढिसाळ, नियोजनशून्य कारभारामुळेच अपघात झाला. ‘चमकोगिरी’ करणारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ओडिशातील बालासोर जिह्यात बाहानगर बाजार स्टेशनवर विचित्र अपघात घडला. शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेस मालगाडीला धडकली आणि डबे घसरले. त्याचवेळी येणारी बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्प्रेसची कोरोमंडल एक्प्रेसच्या डब्यांना धडकली. यामुळे बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्प्रेसचेही डबे घसरले आणि एकच गोंधळ उडाला. दोन्ही एक्प्रेसचे डबे घसरल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. हा अपघात एवढा भीषण होता की, रेल्वे डबे तुटले, रूळ उखडले. शेकडो प्रवासी डब्यांमध्ये अडकले होते. कटरच्या सहाय्याने डबे तोडावे लागले. 24 तास झाले तरी बचावकार्य सुरू होते. आतापर्यंत 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक हजारांवर प्रवासी जखमी आहेत.

कवचनव्हते

रेल्वे अपघात रोखण्यासाठी सर्व मार्गांवर अॅण्टी ट्रेन कोलीसन सिस्टिम अर्थात ‘कवच’ बसविणार अशी घोषणा मोदी सरकारने केली होती. मात्र हे ‘कवच’ बसविलेच नाही. हे सुरक्षा ‘कवच’ असते तर भीषण अपघात झाला नसता आणि 288 प्रवाशांचे प्राण गेले नसते.

जबाबदारी फिक्स करा; रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

विरोधी पक्षांनी भीषण रेल्वे अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून पेंद्र सरकारने जबाबदारी फिक्स करावी आणि रेल्वेमंत्री वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, प्रवाशांची सुरक्षा हेच रेल्वेचे मुख्य प्राधान्य असले पाहिजे. याबाबत पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत. पण त्यासाठी वाट पाहू. सध्या तातडीने बचावकार्य करून जखमी प्रवशांना दिलासा दिला पाहिजे.

ज्या मार्गावर अपघात झाला तेथे ‘सुरक्षा कवच’ नव्हते. अपघाताबाबत अनेक गंभीर प्रश्न आहेत तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी म्हटले आहे.

भाकप, राजद, जदयुने रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही काँग्रेस नेत्यांनीही रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे म्हटले आहे.

मोदी सरकारचे लक्ष केवळ लक्झरी रेल्वेकडे आहे. सामान्य प्रवाशांच्या रेल्वे, रुळांची अवस्था याकडे दुर्लक्ष असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

 

स्टेशन, रुग्णालय परिसरात आक्रोश

अपघाताच्या वृत्तानंतर अनेक प्रवाशांचे कुटुंबीय, निकटवर्तीय घटनास्थळी पोहचत आहेत. यामुळे रेल्वे स्टेशन आणि बालासोर सरकारी रुग्णालयात प्रचंड गर्दी उसळली.

अपघात एवढा भीषण होता की, अनेकांचे हात, पाय तुटले आहेत. मृतांची ओळख पटणेही कठीण झाले असून परिसरात आक्रोश सुरू आहे.

स्टेशनवर शंभरावर अॅम्ब्युलन्स सज्ज असून जखमींना रुग्णालयात आणले जात आहे. दर तासाला जखमींची भर पडत असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी कोणालाच नाही – ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशात अपघातस्थळी भेट दिली. हा शतकातील सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वेचे दुर्लक्ष झाले आहे. सुरक्षेची काळजी कोणालाच नाही, असा संताप ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव उपस्थित होते. मी रेल्वेमंत्री असताना अॅण्टी कोलिसन सिस्टम बसविली होती. ही सिस्टम आता दिसत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या अपघातात बहुतांशी प्रवासी पश्चिम बंगालचे आहेत. ममता बॅनर्जी यांनी 70 अॅम्ब्युलन्स, 40 डॉक्टर आणि परिचारिकांचे पथक बालासोरला पाठविले आहे. तसेच किरकोळ जखमींना पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केली.

अपघात असा झाला

रेल्वेच्या प्राथमिक चौकशीनुसार शुक्रवारी सायंकाळी 6.50 वाजता कोरोमंडल एक्प्रेस बाहानगर स्टेशनवर आली. मेनलाईनऐवजी लुप लाईनच्या ट्रकवर (रुळावर) गेली. लुप लाईनवर आधीच मालगाडी पार्क केलेली होती. त्यामुळे कोरोमंडल एक्प्रेस मालगाडीवर धडकली. कोरोमंडल एक्प्रेसचे इंजिन थेट मालगाडीवर चढले आणि प्रवासी डबे घसरले.

त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत 6.55 वाजता बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्प्रेस शेजारच्या ट्रकवर आले. त्या ट्रकवर कोरोमंडल एक्प्रेसचे डबे घसरले होते. त्या डब्यांना धडकली. यामुळे बंगळुरू-चेन्नई एक्प्रेसचेही डबे घसरले.

कोरोमंडल एक्प्रेसचा वेग ताशी 128 कि.मी. होता, तर बंगळुरू-हावडा एक्प्रेसचा वेग ताशी 116 कि.मी. होता.

दोन्ही एक्प्रेस गाडय़ांमधून 2000 प्रवासी होते.

दिवसभरात काय घडले

बचावकार्य आणि ट्रक पूर्ववत करण्यासाठी 500 मजूर आणि व्रेनच्या सहाय्याने काम सुरू. या मार्गावरील 39 रेल्वे गाडय़ा रद्द केल्या पिंवा दुसऱ्यामार्गे वळविण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपघातस्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या प्रवाशांची विचारपूस केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अपघातस्थळी पाहणी आणि रुग्णालयाला भेट. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची अपघातस्थळी भेट. बचावकार्याचा आढावा.

रेल्वेमंत्र्यांची चमकोगिरी

अपघातामुळे देशभरात संताप असतानाच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची बाहानगर स्टेशनवर ‘चमकोगिरी’ पाहायला मिळाली. आज रेल्वेमंत्री अपघातस्थळी पोहचले आणि पाहणी करताना रेल्वेखाली घुसून पाहणी केली. त्यांनी हेल्मेटही घातले नव्हते. यावर सर्वत्र टीका होत आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांना साहेबांच्या (पंतप्रधान मोदी) रोगाची लागण झाली आहे. ते लाजेखातर आणि नैतिकतेपोटी राजीनामा काय देणार, अशी टीका माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंग यांनी ट्विटद्वारे केली असून, त्यांनी रेल्वेमंत्र्यांचा पह्टोही शेअर केला आहे.

दोषींना सरकार सोडणार नाही. कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून 10 लाख, गंभीर जखमींना 2 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांना 5 लाख, गंभीर जखमींना 1 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत बोलायचे तर लालबहादूर शास्त्रींचे उदाहरण देशासमोर आहे. आताच्या राज्यकर्त्यांनी त्यांना योग्य वाटेल ते करावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.