Odisha Train Accident ‘विंडो सीट’चा हट्ट पथ्यावर पडला, सीटच्या अदला-बदलीमुळे बाप लेकीचा जीव वाचला

ओडिशातील बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये 275 जणांचा मृत्यू झाला, तर एक हजारांहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. या अपघाताच्या भीषणतेबाबत क्षणाक्षणाला वेगवेगळ्या बातम्या येत असून अनेकांनी यात आपल्या जवळच्यांना गमावले आहे. याच दरम्यान एक वेगळी बातमी आली असून 8 वर्षीय मुलीचा विंडो सीटचा हट्ट बाप लेकीच्या पथ्यावर पडला आहे. यामुळे दोघांचाही जीव वाचला आहे.

आठ वर्षांची मुलगी आपल्या वडिलांसोबत कोरोमंडल एक्सप्रेसने प्रवास करत होती. याच दरम्यान मुलीने विंडो सीटसाठी हट्ट धरला. वडिलांनीही लागलीच दुसऱ्या डब्यातील प्रवाशांना विनंती करत सीटची अदला-बदली केली. नंतर कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला, मात्र सीटच्या अदला-बदलीमुळे बाप लेकीची जीव वाचला. ज्या डब्यात त्यांची सीट होती तो डबा पूर्णपणे चक्काचूर झाला. यातील बहुतांश प्रवाशांनी जीव गमावला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी कर्मचारी असणारे एम. के. देब आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी खडगपूरला कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये चढले होते. त्यांना कटक रेल्वे स्थानकावर उतरायचे होते. त्यांनी डॉक्टरांची अपॉइंटमेटं घेतली होती. त्यांच्याकडे थर्ड एसी कोचचे तिकीट होते, मात्र मुलीने विंडे सीटचा हट्ट धरला.

याबाबत बोलताना देब म्हणाले की, आम्ही विंडो सीट मिळावी यासाठी प्रयत्न करत होतो, मात्र आमच्या डब्यात एकही विंडो सीट उपलब्ध नव्हती. त्यानंतर आम्ही टीसीकडे विनंती केली आणि शक्य असल्यास इतर प्रवाशांसोबत सीटची अदला-बदली करण्याचे सूचवले. त्यानंतर टीसी आणि आम्ही दुसऱ्या डब्यात गेलो आणि तिथे दोन प्रवाशांना विनंती करून सीटची अदला-बदली केली. ते दोघेही आमचे ज्या डब्यात तिकीट होते तिथे गेले आणि आम्ही त्यांच्या जागेवर बसलो. हा डबा आमच्या आधीच्या डब्यापासून तीन डबे सोडून होता.

दरम्यान, कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला तेव्हा ही बाप लेक बसलेल्या डब्याचे जास्त नुकसान झाले नाही. मात्र इतर डब्यांसह त्यांची सीट ज्या डब्यात होती त्याचा पार चेंदामेंदा झाला. यातील बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यांनी ज्या प्रवाशांसोबत सीट अदला-बदली केली त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही. मात्र ते सुरक्षित असावेत अशी प्रार्थना देब यांनी केली. तसेच आम्ही बचावलो हा चमत्कारच असून यासाठी देवाचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.