दुर्देवी..! नोकरीच्या शोधात निघालेल्या तीन सख्ख्या भावांचा ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू

गेल्या वीस वर्षातील हिंदुस्थानातला सर्वात मोठा रेल्वे अपघात ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी घडला. कोरोमंडल एक्स्प्रेस, मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनची धडक होऊन हा भंयकर अपघात झाला. ज्यामध्ये आतापर्यंत किमान 288 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अद्यापही मृतांच्या संख्येत वाढ होत असून 900 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भयंकर अपघाताचे दृश्य पाहून देशातील अवघी जनता सुन्न झाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघं नोकरीच्या शोधात तामिळनाडूला जायला निघाले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बसंती येथील रहिवासी हरण गायन (40), निशिकांत गायन(35), दिबाकर गायन (32) अशी त्या मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावं आहेत. हे तिघेही भाऊ सहसा कामानिमित्त बहुतांश वेळ ते दक्षिणेकडील राज्यात राहत असत आणि तेथे शेतमजूर म्हणून काम करत. काही दिवसांपूर्वी ते भात मळणीसाठी घरी आले होते. घरातील शेतीची कामं आटपल्यानंतर ते पुन्हा कामाच्या शोधात कोरोमंडल एक्स्प्रेसने तामिळनाडूला निघाले होते.

तीन सख्ख्या भावांच्या मृत्यूची माहिती गावात समजताच सर्वत्र शोककळा पसरली. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनूसार, हरणची पत्नी अनाजिता ही सतत आजारी असते.तिच्या उपचारांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. निशिकांत यांच्या पश्चात पत्नी व्यतिरिक्त एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे. तर, दिबाकर यांच्या पश्चात दोन मुलगे व पत्नी असा परिवार आहे.

याशिवाय बसंती येथील चरणेखळी गावातील आणखी दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. विकास हलदर आणि संजय हलदर अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हे दोघेही घरातून बाहेर पडल्याचे समोर आले आहे. या रेल्वे अपघातात बसंती आणि गोसाबा भागातील अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.