गावकऱ्यांनी हिणवले, गिनीज बुकने गौरवले; 31 बोटे असणाऱ्या महिलेची अनोखी कहाणी

2543

एखाद्या व्यक्तीत व्यंग असेल तर तो समाजाच्या चेष्ठेचा विषय ठरतो. समाजाकडून होणाऱ्या या वागणुकीमुळे अशी माणसे एकाकी पडतात. कधी एखादा अवयव जास्त असेल, काही विचित्र असेल तर त्या व्यक्तीला हडळ, जखीण, भूत, प्रेतात्मा असे हिणवले जाते. मात्र, अशा व्यक्तींमध्ये विशेष कौशल्य आढळल्यास त्यांना देवत्व देण्यात आल्याच्या गोष्टीही घडल्या आहेत. ओदिशातील एका महिलेला एकून 31 बोटे असल्याने गावकऱ्यांनी तिला चेटकीण म्हणून हिणवले. मात्र, गिनीज बुकने या महिलेची दखल घेत, तिचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले. त्यामुळे आता या महिलेची परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ओदिशाच्या गंजम जिल्ह्यात राहणाऱ्या या 63 वर्षांच्या महिलेचे नाव नायक कुमारी आहे. त्यांच्या पायाला 19 आणि हाताला 12 बोटे आहेत. अशी एकून त्यांना 31 बोटे आहेत. त्यांच्या या विशेषतेमुळे गिनीज बुकमध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्यांना 31 बोटे असल्याने गावकऱ्यांनी त्यांना चेटकीण ठरवले आहे. तसेच गावातील कोणीही त्यांच्याशी बोलत नाही. त्यांना गावकऱ्यांनी गावाबाहेर काढले आहे. त्या कोणाजवळ गेल्यास लोक त्यांना मारण्यासाठी धावतात. त्यामुळे नायक कुमारी गावाबाहेर एका झोपडीत राहतात. घरच्या गरीबीमुळे त्या उपचार घेऊ शकत नाहीत. तसेच जास्त असलेल्या बोटांवर शस्त्रक्रियाही करू शकल्या नाहीत. त्यांच्या या व्यंगामुळे त्यांचे कुटुंबही त्यांना सोडून गेले आहेत.

शरीरातील अशा व्यंगाला वैज्ञानिक भाषेत पॉलीडैक्टिली असे म्हणातात. हे सामन्य व्यंग आहे. सुमारे 5 हजार जणांपैकी एकाला असे व्यंग असू शकते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात बोटे असणे ही असामान्य बाब आहे. नायक कुमारी या 31 बोटे असलेल्या जगातील एकमेव महिला आहेत. त्यामुळेच त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. गिनीज बुकने नायक कुमारी यांची दखल घेतल्याने त्यांची परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्या चेटकीण नसून त्यांच्या शरीरात एक प्रकारचे व्यंग आहे. गावकऱ्यांनी ही बाब समजून घेऊन त्यांना समाजात स्थान द्यावे, त्यासाठी गावकऱ्यांमध्ये याबाबत जागृती करण्याची गरजही व्यक्त होत आहे. गनीज बुकने त्यांची दखल घेतल्यावर स्वंयसेवी संस्था आणि सरकारचेही त्यांच्याकडे लक्ष गेले असून त्यांना मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारने त्यांना घर दिल्यास आणि पेन्शन सुरू केल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. त्यामुळे सरकारने आणि स्वंयसेवी संस्थांनी नायक कुमारी यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या