आर्थिक अपहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री निलंगेकरांविरोधात गुन्हा

28

सामना ऑनलाईन, मुंबई
मराठवाडा मित्र मंडळाच्या अध्यक्षपदाचा फायदा घेत वांद्रे येथील सुमारे ३ लाख ६९ चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ बिल्डरांना विकून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निलंगेकर यांच्यासह विकासक मे. समृद्धी आर्केड प्रा. लि., मे. अग्रवाल कन्स्ट्रक्शन कंपनी आणि कंपनीच्या भागीदारांविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नाममात्र दराने मराठवाडा मित्र मंडळाने खेरवाडी येथील चेतना महाविद्यालयाजवळील एक जागा अभियांत्रिकी, महाविद्यालय, वसतिगृह, एमबीए महाविद्यालय उभारण्यासाठी खरेदी केली. त्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून अतिरिक्त चटईक्षेत्र दिले. मात्र मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष निलंगेकर यांनी विकासकांसोबत त्रिपक्षीय करार करताना मंडळातील सदस्यांना विचारात न घेताच व्यवहार केला असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी केला आहे. या प्रकारामुळे मंडळाचे कोट्यवधी रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याने २८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या