शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य…विधानसभेत ‘दादा भुसे… मुर्दाबाद’

 ‘पन्नास खोके माजलेत बोके…’, ‘पन्नास खोके, एकदम ओके…’, ‘दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय…’ अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या आमदारांनी आज विधानसभेत अध्यक्षांसमोरील आसनासमोर येऊन आंदोलन केले. त्यावर भुसे यांच्या वक्तव्यातील आक्षेपार्ह वक्तव्य तपासून ते रेकॉर्डवरून काढून टाकण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी बंदरे विकासमंत्री दादा भुसे यांच्याबद्दल ट्विट केले होते. दादा भुसे यांनी ‘गिरणा अॅग्रो’ नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स गोळा केले; पण कंपनीच्या वेबसाईटवर 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट असून त्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत अशा आशयाचे ते ट्विट होते.

दादा भुसे यांनी नियम 48 अन्वये विधानसभेत निवेदन करताना हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य संतप्त झाले. ते जोरदार घोषणा देत भुसे यांचा निषेध करत अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत आले. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना त्यावर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. शरद पवार हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे नाव अशा आक्षेपार्ह पद्धतीने घेऊ नका असे अजित पवार म्हणाले. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी, दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यातून शरद पवार यांचा अवमान करण्याचा काहीही उद्देश नसून त्यांनी कोणतेही अनुद्गार काढलेले नाहीत असे सभागृहात सांगितले.

आक्षेपार्ह वक्तव्य वगळण्यात येईल-अध्यक्ष

अध्यक्ष नार्वेकर यांनी आजच्या दिवसाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत आपण भुसे यांचे वक्तव्य तपासून त्यातील जे अनुचित असेल ते पटलावरून काढून टाकू असे आश्वासन दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य शांत झाले. आमदार जयंत पाटील यांनी भुसे यांचे वक्तव्य हे प्रसार माध्यमांमधून प्रसारीतही झाले असल्याने अध्यक्षांनी आपला निर्णय तातडीने द्यावा अशी मागणी केली.