
देशाची आर्थिक राजधानी असणाऱया मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. त्यापाठोपाठ डिजीटल पेमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘फोन-पे’ या पंपनीचे मुंबईत असलेले कार्यालय कर्नाटकात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला हलविण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाचे मुख्यालय मुंबईबाहेर नेण्यात आले. मुंबईतील केंद्र सरकारशी निगडीत विविध संस्थांची कार्यालये मागील काही महिन्यांत दिल्ली व अन्य ठिकाणी हलविण्यात आली आहेत. मुंबई व महाराष्ट्रातून कॉर्पोरेट कंपन्या तसेच प्रकल्पांची पळवापळवी सुरू असतानाच ‘फोन-पे’ या पंपनीचेही मुंबईतील मुख्य कार्यालय कर्नाटकमध्ये हलविण्यात येणार आहे.
सोशल मीडियात संताप
‘फोन-पे’चे कार्यालय मुंबईबाहेर कर्नाटकात कुठे नेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यासंदर्भातील एक मराठी जाहिरात बंगळुरू येथून देण्यात आली आहे. वर्तमानपत्रात छापून आलेली ही जाहिरात व्हायरल होताच सोशल मीडियात संताप व्यक्त केलात जात आहे.
‘फोन-पे’ या कंपनीचे मुंबईतील अंधेरी येथील मुख्य कार्यालय महाराष्ट्राबाहेर हलविण्यासंदर्भात कंपनीने एक बैठक घेतली. ज्यात मुंबईतील ऑफिस महाराष्ट्राबाहेर म्हणजे कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव आता केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्याता आला आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर ‘फोन-पे’चे मुंबईतील मुख्य कार्यालय महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमध्ये नेण्यात येणार आहे.