अधिकाऱ्याचा पत्नीला जाच, शिविगाळ करत धमकावल्याचा आरोप

सामना ऑनलाईन । नांदेड

बिलोल येथील महसूल विभागात उपविभागीय अधिकारी असलेल्या एका अधिकाऱ्यावर त्याच्याच पत्नीने शिवीगाळ आणि धमकीचा आरोप केला आहे. निवृत्ती गायकवाड असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्याविरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी निवृत्तीचा विवाह पूजा हिच्याशी झाला होता. लग्नानंतर त्या दोघांमध्ये मतभेद कायम सुरू होते. पूजाने निवृत्तीविरुद्ध नांदेड येथील नायगाव पोलीस स्थानकातही मारहाण आणि शाब्दिक छळ केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पूजा पुण्याला तिच्या माहेरी येऊन राहत होती. मात्र, तिथेही फोन करून निवृत्तीने आपल्याला अश्लील शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पूजाने केला आहे. त्यामुळे जीविताला धोका निर्माण होण्याच्या भीतीने तिने विश्रामबाग पोलिसांत तक्रार केली.

पूजाने केलेल्या तक्रारीची त्वरीत दखल घेऊन विश्रामबाग पोलिसांनी आयपीसी कलम ५०७ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच नांदेड येथील पोलीस स्थानकातही निवृत्तीविरुद्ध मारहाण आणि शिवीगाळ केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या