म्हैसकर ‘म्हाडा’तून ‘वना’त! सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

2069

सोमवारी सात सनदी अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची सोमवारी बदली करण्यात आली. म्हाडामधून त्यांची मंत्रालयात वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या केंद्रातील प्रतिनियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नेमणूक झाली आहे.

म्हैसकर यांच्याबरोबरच अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजनको कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी के. एच. बगाटे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. जलस्वराज्य प्रकल्प संचालक ए. ए. गुल्हाने यांची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून तर संभाजीनगरचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव म्हणून नेमणूक झाली आहे. समग्र शिक्षा अभियानच्या राज्य प्रकल्प संचालक अश्विनी जोशी यांना पदमुक्त करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या