मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना व विरोधी पक्षनेत्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप, वाचा सविस्तर…

4420

राज्यात 28 नोव्हेंबरला ‘महाविकासआघाडी’चे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन होऊन आता पाच दिवस झाले असून मंत्र्यांना आणि विरोधी पक्षनेत्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्याचा निर्णय सोमवारी शासनाने घेतला. या निर्णयानुसार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिलमधील ‘सागर’ या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले. यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ, मंत्री जयंत पाटील आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना नवीन बंगल्याचे वाटप करण्यात आले.

शासकीय निर्णयानुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’ हे निवासस्थान देण्यात आले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना ‘रॉयलस्टोन’ हा बंगला देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना ‘रामटेक’ हा बंगला देण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाममंत्री असताना शासनाने भुजबळ यांना हाच बंगला दिला होता. यासह जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ हा बंगला देण्यात आला आहे.

याआधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्र्यांनाही आपले बंगले सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. पदावरून मुक्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत निवासस्थान रिक्त करण्याचा शासकीय नियम आहे. यानुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘वर्षा’ निवासस्थानावरील आपला मुक्काम अन्यत्र हलवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या