इराण आणि अमेरिकामध्ये युद्धजन्य परिस्थिती, तेलांच्या किंमतीत पाच टक्क्यांनी वाढ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इराणने अमेरिकेचे एक ड्रोन पाडले होते ही खूप गंभीर चूक केली असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले. आता इराण आणि अमेरिकामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम तेलांच्या किंमतींवरही झाला आहे. तेलांच्या किंमतींमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गुरूवारी इराणने आंतरराष्ट्रीय हवाई मार्गात अमेरिकेचे एक ड्रोन मिसाईलने पाडले असा दावा अमेरिकेने केला आहे. त्यावर ट्रम्प यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत इराणने ही मोठी चूक केली आहे असे म्हटले आहे.

इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रीव्हॉल्युशनरी गार्ड्सनी अमेरिकेच्या ड्रोनला गोळी मारून पाडले. तेव्हा अमेरिकेने कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता ट्रम्प यांनी ट्विट केल्याने दोन्ही देशांमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

या दोन्ही देशांच्या तणावात तेलांच्या किंमतीत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे देशात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी 13 जून रोनी ओमानच्या आखातात तेलाच्या दोन टॅंकरवर हल्ले झाले होते. हा हल्ला इराणने केला होता असा आरोप अमेरिकेने केला होता, परंतु इराणने हा आरोप फेटाळला होता.