‘ओखी’ वादळ गोव्यात थडकले

सामना प्रतिनिधी । मालवण

तामीळनाडू-केरळला तडाखा देणाऱ्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिह्याच्या किनारपट्टीवर दिसून येत आहे. समुद्राला मोठे उधाण आले असून काही ठिकाणी किनाऱ्यावर जोरदार लाटा धडकत आहेत.

दरम्यान, रविवारी सकाळपासून वाऱ्यानेही जोर धरला. याचा थेट परिणाम मासेमारीबरोबरच मालवणच्या पर्यटन व्यवसायावर झाला आहे. सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक तसेच स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्टस् बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांना माघारी परतावे लागले.

रविवारी सकाळी मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर उभारलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या स्टॉलमध्ये समुद्राचे पाणी घुसले होते. समुद्र खवळल्याने सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक संघटनेने दिवसभर होडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच स्कुबा डायव्हिंग इतर वॉटरस्पोर्टदेखील बंद ठेवण्यात आले होते. वादळाचा धोका लक्षात घेऊन बंदर विभागाने मालवणसह दांडी, वायरी, तारकर्ली, देवबाग, चिवला बीच, तळाशील-तोंडवळी या किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान शनिवार-रविवार या सुट्ट्य़ांमुळे मालवणात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, मात्र किल्ला होडी सेवा तसेच वॉटरस्पोर्ट बंद राहिल्याने त्यांचा हिरमोड झाला. बंदर जेटीवर गर्दी केलेल्या पर्यटकांनी बंदर जेटी येथून किल्ल्याचे दर्शन घेऊन समाधान मानले.

धोक्याचा दोन नंबर बावटा कायम
किनारपट्टीवर धोक्याच्या सूचनेचा दोन नंबरचा बावटा ६ डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याची सूचना हवामान खात्याने दिली असून मच्छीमार व जलपर्यटन व्यावसायिकांना समुद्रात न जाण्याचा इशारा बंदर विभागाने दिला आहे.

४८ तास समुद्र खवळलेला राहणार
प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या ४८ तासांत सिंधुदुर्ग जिह्यातील समुद्र खवळलेला राहणार असून समुद्रात सोसाट्य़ाचे वारे वाहणार आहेत. तरी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्गचे अध्यक्ष उदय चौधरी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या