ओखी चक्रीवादळाचा तडाखा, पोलिसांच्या गस्ती नौकेसह ३ मासेमारी नौका बुडाल्या

28

सामना प्रतिनिधी । मालवण

अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण किनारपट्टीला बसला. समुद्री लाटांच्या मार्‍यात पोलिसांच्या सिंधू-५ या हायस्पीड गस्तीनौकेस जलसमाधी मिळाली. नौकेवरील पोलीस कर्मचारी सिंधू-२ या नौकेचा आसरा घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

दांडी येथील मच्छीमारांच्या तीन व पर्यटन व्यावसायिकांच्या दोन नौका लाटांच्या तडाक्यात भरकटल्या. त्यापैकी २ पर्यटन व्यावसायिकांच्या बोटींना किनाऱ्यावर सुखरुप आणण्यास मच्छिमार बांधव व बचाव पथकास यश आले. मात्र तीन पैकी दोन मासेमारी नौका जाळ्यांसह समुद्रात बुडाल्या. तसेच किनाऱ्यावर असलेली अन्य एक नौका लाटांच्या तडाख्यात सापडुन दुर्घटनाग्रस्त झाली. पोलीस गस्ती नौका व मासेमारी बोटी बुडल्याने सुमारे ५० लाखाचे नुकसान झाले आहे.

केरळ, तमिळनाडू तडाखा देत पुढे सरकलेल्या ओखी चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात दिसून आला. मध्यरात्री समुद्री लाटा अधिकच वाढल्याचे दिसून आले. समुद्राच्या उंच लाटांचा मारा किनार्‍यावर होत होता. दरम्यान बंदर जेटीनजीकच्या समुद्रात उभ्या असलेल्या सिंधू-५ या गस्तीनौकेत समुद्री लाटांचे पाणी घुसले. नौकेतील व्ही. बी. चव्हाण, एस. एस. शेलटकर, एस. ए. पावसकर, के. आर. जोशी या पोलिस कर्मचार्‍यांना नौकेत लाटांचे पाणी घुसत असल्याचे दिसून आले. नौका बुडणार हे लक्षात येताच नौकेवरील कर्मचार्‍यांनी शेजारीच असलेल्या सिंधू-२ या गस्तीनौकेत स्थलांतर केले. गस्ती नौका बुडल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी मालवणात धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या