आंबा, भात, द्राक्ष, स्ट्रॉबेरीची माती; अर्नाळ्यात आठ घरे वाहून गेली

66

सामना प्रतिनिधी । अलिबाग / पालघर / ठाणे

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा आज ओखी वादळाचा तडाखा व पावसामुळे पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाला. अचानकपणे हवामानात झालेल्या बदलामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील आंबा, नाशिकची द्राक्षे, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि ठाणे, रायगडातील भाताची अक्षरशः माती झाली. डोळय़ांदेखत बहराला आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकऱयांचे कंबरडे मोडले असून भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. सरकारने वाऱयावर सोडले आणि बेमोसमी पावसाने झोडपले, आता दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल निर्माण झाला आहे.

कोकण किनारपट्टीकडून गुजरातच्या दिशेने निघालेल्या ओखी वादळाने आज रायगड, ठाणे, पालघरच्या समुद्रकिनाऱयांना जबरदस्त तडाखा दिला. या वादळामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या. त्यामुळे अर्नाळा गावातील लक्ष्मण मेहेर, अरुण मेहेर, गणेश केणी, कैलास मेहेर, प्रकाश म्हात्रे, महेंद्र मेहेर, हसुमती म्हात्रे, अनुसया मेहेर या आठ जणांची घरे वाहून गेली.

त्या 35 बोटी सुखरूप परतल्या

पालघरच्या समुद्रातील सोमवारी भरकटलेल्या 35 बोटी आज किनाऱयावर सुखरूप पोहोचल्या. त्यामुळे मच्छीमारांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान सातपाटी, मोरबा, केळवा, वडराई, दातिवरे येथे उंचच उंच लाटा उसळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुलाबा इथे 54 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे 28 मिमी पावसाची नोंद.

मुंबईत आज कमाल तापमान 32.8 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली.

कुलाब्यात सर्वाधिक पाऊस

कुलाबा – 37 मिमी
सीएसएमटी – 38 मिमी
दादर – 26 मिमी
घाटकोपर – 18 मिमी
भांडुप – 15 मिमी
अंधेरी – 23 मिमी
कांदिवली – 28 मिमी
बोरिवली – 28 मिमी
गोरेगाव – 25 मिमी
मालाड – 23 मिमी

आपली प्रतिक्रिया द्या