शंभरी भरलेले पूल!

91

धोकादायक पुलांच्या सर्वेक्षणातून जी गंभीर माहिती पुढे आली आहे त्यावर तत्परतेने काम सुरू व्हायला हवे. सावित्री नदीवरील नवीन पूल सरकारने १० महिन्यांत बांधून पूर्ण केला; मात्र मुंबईगोवा महामार्गावरील लहानमोठे १५ ब्रिटिशकालीन पूल अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत हे वास्तव आहे. शंभरी भरलेले असे सगळेच पूल एक तर नव्याने बांधायला हवेत किंवा तातडीने त्यांची डागडुजी तरी व्हायला हवी.

देशभरात राष्ट्रीय महामार्गांवरील शंभर पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून, ते कधीही कोसळू शकतील अशी स्थिती आहे. कळते, समजते, सूत्रांनी सांगितले अशा धाटणीची ही बातमी नाही. खुद्द केंद्रीय सरकारनेच लोकसभेत ही माहिती दिली आहे. त्यामुळे वृत्त अगदी १०० टक्के सत्य आणि विश्वासार्ह आहे, असे म्हणायला हरकत नाही. कोकणात गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजी महाड येथे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेला दोनच दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले आणि त्यापाठोपाठ ही भयंकर माहिती समोर आली आहे. खुद्द भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच लोकसभेतील प्रश्नोत्तरात ही माहिती दिली आहे. गतवर्षी धो-धो पाऊस आणि महापुरामुळे रौद्र रूप धारण केलेल्या सावित्री नदीवरील पूल पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि त्याच वेळी पुलावरून जाणारी एसटी आणि इतर काही वाहने पुलासोबतच सावित्री नदीच्या पुरात गडप झाली. या दुर्घटनेत ४२ जण मृत्युमुखी पडले होते. आता देशातील १०० पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतील अशा स्थितीत असल्याची माहिती खुद्द सरकारच जेव्हा देते तेव्हा जेमतेम वर्षभरापूर्वीची अंगावर शहारे आणणारी ही दुर्घटना आठवल्याशिवाय राहात नाही. ‘सावित्री’च्या दुर्दैवी घटनेनंतर सरकारने देशभरातील तमाम राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या पुलांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची घोषणा केली होती. अशा दुर्घटना देशामध्ये भविष्यात घडू नयेत हा या

ऑडिटमागचा हेतू

होता. त्यानुसार देशभरातील पुलांच्या मजबुतीचे आणि एकूणच स्थितीचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. ‘सेफ्टी ऑडिट’मुळे देशातील पुलांची परिस्थिती सुधारली काय, याचे नेमके उत्तर मिळाले नसले तरी किती पूल सुस्थितीत आहेत, किती पुलांची देखभाल, दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि किती पुलांची परिस्थिती चिंताजनक आहे याचा तपशील तरी वर्षभरात सरकारकडे गोळा झाला. देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर नेमके किती पूल आहेत याची संख्याच वर्षभरापूर्वी सरकारकडे नव्हती. ‘सेफ्टी ऑडिट’च्या कामामुळे देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर १ लाख ६० हजार पूल आहेत. या आकड्याचा शोध सरकारला लागला हेदेखील मोठेच काम झाले म्हणायचे! कुठलेही काम व्यापक पातळीवर हाती घ्यायचे म्हटले की, आकडेवारी आणि माहितीचे संकलन आवश्यकच ठरते. पुलांच्या बाबतीत ते काम आता झाले आहे. अर्थात, पुढचे काम खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे. धोकादायक बनलेल्या पुलांच्या जागी नवे पूल बांधण्याचे काम सरकारने लवकरात लवकर हाती घ्यायला हवे. जे पूल डागडुजी आणि दुरुस्ती करून मजबूत करणे शक्य आहे त्या पुलांचीही कामे तातडीने करायला हवीत. खास करून १०० वर्षांहून अधिक आयुर्मान असलेल्या पुलांखालून आजवर बरेच पाणी वाहून गेले आहे. जीर्ण-शीर्ण झालेले स्वातंत्र्यपूर्व काळातील प्राचीन पूल आता फार काळ तग धरतील अशी स्थिती नाही. त्यामुळे सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याआधी धोकादायक बनलेल्या

जुन्या पुलांच्या जागेवर

नवे पूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू व्हायला हवे. केवळ आकडेवारी गोळा करून किंवा ती जाहीर करून भागणार नाही. शिवाय पुलांची डागडुजी, देखरेख व देखभाल, दुरुस्ती यावरही सरकारचे बारीक लक्ष हवे. अनेकदा दुरुस्ती आणि देखभाल कागदावरच होते आणि प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. अधिकारी आणि कंत्राटदार यांचे भ्रष्ट ‘रॅकेट’ बिले उचलण्यापुरती कामे करून जनतेच्या जिवाशी खेळत असतात. अलीकडच्या काळात बांधलेल्या पुलांना ५-१० वर्षांतच तडे जातात. कित्येकदा तर पुलाचे काम सुरू असतानाच तो कोसळतो आणि निष्पाप लोक त्यात मृत्युमुखी पडतात. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात कोलकाता येथे निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळून २६ जण ठार झाले होते. अशा घटना घडल्यानंतर चौकशा होतात. अटका-सटका आणि मग जामीन वगैरे उपचार होतात. चौकशी आयोगांचे अहवाल येतात आणि पुढची दुर्घटना घडेपर्यंत हे अहवाल धूळ खात पडून राहतात. हाच आजवरचा अनुभव आहे. हे टाळण्यासाठी धोकादायक पुलांच्या सर्वेक्षणातून जी गंभीर माहिती पुढे आली आहे त्यावर तत्परतेने काम सुरू व्हायला हवे. सावित्री नदीवरील नवीन पूल सरकारने १० महिन्यांत बांधून पूर्ण केला; मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील लहान-मोठे १५ ब्रिटिशकालीन पूल अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत हे वास्तव आहे. शंभरी भरलेले असे सगळेच पूल एक तर नव्याने बांधायला हवेत किंवा तातडीने त्यांची डागडुजी तरी व्हायला हवी. अन्यथा ‘सावित्री’सारख्या दुर्घटना भविष्यातही घडण्याचा धोका कायमच राहील.

आपली प्रतिक्रिया द्या