४९ लाखांच्या जुन्या नोटा सापडल्या, भाजपच्या दोन नगरसेविकांच्या पतींना अटक

13

सामना ऑनलाईन, धुळे

शहरात २ एप्रिलला सायंकाळी चलनातून बाद ठरविण्यात आलेल्या हजार आणि पाचशे रुपये किमतीच्या नोटा सापडल्या. एकूण ४९ लाख, ७८ हजार पाचशे रुपयांचे मूल्य असलेल्या या नोटा तसेच कार पोलिसांनी ताब्यात घेतली. याशिवाय नोटा बाळगत असलेल्या तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील दोघे शहादा येथील भाजप नगरसेविकांचे पती आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८नोव्हेंबर २०१६ ला मध्यरात्रीपासुन चलनातील हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या नोटा बाद ठरविल्या. सर्वसामान्य नागरिकांना या नोटा ३१ डिसेंबरपर्यंत बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. शहरात २ एप्रिलला सायंकाळी एम.एच.३९-जे.८६६३ या क्रमांकाच्या कारमध्ये चलनातून बाद ठरविलेल्या नोटा मोठ्या प्रमाणात घेऊन काही जण आले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. संशयीत कार नटराज चित्रमंदिराजवळ असतांना आझादनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कार अडविली. कारची झाडाझडती घेतली त्यावेळी पुढील बाजूस हजार रुपये मूल्याच्या नोटा एका बॅगेत आढळल्या तर कारच्या मागील सीटवर पाचशे रुपये किमतीच्या अनेक नोटा प्लॅस्टिक पिशवीत ठेवण्यात आल्या होत्या.

कार, नोटा आणि तिनही संशयीत आझादनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. नोटा कुणाच्या आहेत? त्या कुणाला देणार होते? असा प्रश्न पोलिसांनी विचारला पण तिघांनीही आपल्याला त्या विषयी काहीच माहित नाही, असे सांगितले. अखेरीच लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली. अजय लक्ष्मीकांत छाजेड, साजीद ताहेर अन्सारी आणि सतिष सुरेश वाल्हे या तिघांना आझादनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील साजीद अन्सारी आणि सतिष वाल्हे यांची पत्नी शहादा नगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या