जुनं ते सोनं

185

>> पूजा तावरे

आजकाल ७० आणि ८० च्या दशकांतील फॅशनची चलती दिसून येत आहे. ओल्ड इज गोल्ड या म्हणीचा प्रत्यय आता सातत्यानं येऊ लागला आहे. २१व्या शतकात तीच जुनी गोष्ट आता सोन्यासारखी वाटू लागली आहे. ७०-८० चं दशक चमकीदार व चकाकणारे रंग, रंगीबेरंगी व भरजरी केलेले ड्रेस व बोल्ड कपडय़ांसाठी ओळखलं जात असे. पण आता हीच स्टाईल नव्याने फॅशनच्या दुनियेत आली आहे. यामध्ये बेल बॉटम पँटस्पासून साधना टाईट चुडीदारपर्यंतच्या कपड्यांच्या फॅशन पुन्हा एकदा नव्याने लोकांच्या पसंतीस येत आहे.

फ्लोरल
निसर्गाशी संबंधित नक्षीकाम केलेले ड्रेस, साडय़ा फ्लोरलमध्ये दिसून येतात. पूर्वी सायरा बानू ते हेमा मालिनी यांसारख्या अभिनेत्री फ्लोरल डिझाईनचे कपडे वापरताना दिसायचे, पण आता तीच फॅशन नव्या ढंगात सध्याच्या बॉलिवूड स्टार दिपिका पादुकोण ते इशा गुप्ता या अभिनेत्रींसह सुपरस्टार रणवीर सिंग हे वापरताना दिसत आहे.

ऑनिमल प्रिंट
१९७० मध्ये या फॅशन ट्रेंडला ग्लॅमर टच मिळाला आणि त्यानंतर या प्राण्यांच्या त्वचेच्या डिझाईनचा वापर कपडे, हँडबॅग्ज्, फुटवेअर, गॉगल्स, बेल्टस् यावर सुरू करण्यात आला. ऍनिमल प्रिंटचा ट्रेंड पुन्हा एकदा नव्याने मायक्रो स्वरूपात फॅशनमध्ये आला आहे. यामध्ये सध्या छोटय़ा पायांच्या आकाराचे डॉग डेक्सहंड प्रिंटला अधिक पसंती मिळत आहे. आलिया भटने एका चॅनलच्या उद्घाटनप्रसंगी या प्रिंटचा कस्टम ड्रेस परिधान केला होता.

अल्ट्रा टाईट चुडीदार
पूर्वी जुन्या हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अल्ट्रा टाईट चुडीदारची फॅशन दिसून यायची आणि आता तीच फॅशन आता पसंतीस उतरू लागली आहे. पूर्वी आशा पारेख, श्रीदेवी, सायरा बानू या स्टाईलचे चुडीदार परिधान करताना दिसायच्या. पण आता हीच फॅशन सध्याच्या ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोण या थोडय़ा हटके लुकसाठी वापरताना दिसून येत आहेत.

विंटेज स्टाईल पफ कफ्स
पफ कफ्स किंवा स्लिव्जची फॅशन खास करून बंगालमध्ये पाहायला मिळते. दुर्गा पुजा या सणासुदीच्या दिवसात अनेक बंगाली स्त्र्ाया या फॅशनमध्ये दिसून येतात. साठच्या दशकातल्या शॉर्ट स्लीव्ह, सत्तरच्या दशकातील बेल स्लीव्हज इथपासून नव्वदीच्या दशकातील क्रिस्प शर्ट स्लीव्हपर्यंत यामध्ये बदल होत गेला.

बंडाना
बंडाना हा त्रिकोणी अथवा चौकोनी आकाराचा कपडा असतो. थोडासा हटके लुक मिळविण्यासाठी डोक्यावर बांधण्यात येतो. १९८०च्या दशकांत रॉक आणि पंक म्युजिशियन्स् फॅशन स्टाईल म्हणून याचा वापर करत असे. त्याकाळी प्रिंटेड, पोल्का डॉटेड बंडानाला मागणी होती. पण आजच्या फॅशन युगात बंडाना विविध रंगांमध्ये, डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. खेळाडू, कलाकार आणि फॅशनप्रेमी बंडाना वापरताना दिसून येतात.

बोहीमन ड्रेसेस्
अनेक सेलिबेटिज्, बोल्ड फेसेस्, मॉडेल्सची बोहीमन ड्रेसला पसंती दिसून येते. कारण हा ड्रेस अतिशय सिंपल असा आहे. याशिवाय या ड्रेसवर कोणतीही ऍक्सेसरीज् अथवा ज्वेलरीची गरज नसते. पूर्वी झीनत अमान, परवीन बाबी या हे ड्रेसेस घालत असत. आतादेखील या ड्रेसेस्ला पसंती मिळत आहे.

पोल्का डॉट
फॅशनमध्ये आजकाल पलाझो, अनारकली सूट, शरारा आणि पोल्का डॉटचा समावेश आहे. पोल्का डॉटचा ट्रेंडला पुन्हा एकदा बाजारात मागणी दिसून येत आहे. सूटपासून ते हेअर बँडपर्यंतची पोल्का प्रिंटस् पाहायला मिळत आहेत.

(लेखिका फॅशन डिझायनर आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या