अॅम्बेसेडर… काही म्हणा पण जुने ते सोनेच! चलती का नाम…

रवींद्र कश्यप

देशातील रस्त्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांची पसंती मिळवणाऱ्या शानदार ‘अॅम्बेसेडर’ ची विक्री प्युजो या फ्रेंच कंपनीस करण्याचा निर्णय हिंदुस्थान मोटर्सने घेतला. या गाडीबद्दल हिंदुस्थानात जपला गेलेला भावनिक कोपरा या लेखातून  उलगडण्याचा हा प्रयत्न.   

अॅम्बेसेडर म्हणजे हिंदुस्थानी सरकारी थाटाचीच मोटार असे एकेकाळी बनलेले समीकरण तीन वर्षांपूर्वी संपुष्टात आले. हिंदुस्थान मोटर्स या कंपनीने अॅम्बेसेडरची निर्मिती बंद केली. त्यानंतर गेल्याच आठवड्यात अॅम्बेसेडर या ब्रॅण्ड नेमचीही विक्री प्युजो या फ्रेंच कंपनीला केली गेली व अखेर अॅम्बेसेडर हे नाव पुन्हा पाश्चिमात्य देशांकडे गेले. पाश्चिमात्य देशांकडे असे म्हणायचे कारण म्हणजे मुळात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर सी. के. बिर्ला यांच्या हिंदुस्थान मोटर्स या मोटार उत्पादक कंपनीने ब्रिटनच्या कॉवले येथे तयार होणाऱ्या मॉरिस मोटर्स लि. या कंपनीचे मॉरिस ऑक्सफर्ड या मालिकेतील मोटारीवर आधारित अॅम्बेसेडर ही मोटार तयार करण्यात आली. अर्थात त्यात सुधारणाही हिंदुस्थानी परिस्थितीला समजून घेऊन करण्यात आल्या आणि अॅम्बेसेडर हिंदुस्थानी झाली. १९५८ मध्ये सुरू झालेली अॅम्बेसेडर २०१४ पर्यंत सुरू राहिली होती व २०१४ मध्ये हिंदुस्थानातील तिचे उत्पादन पश्चिम बंगालमधील उत्तरपारा येथील प्रकल्पात पूर्णपणे बंद झाले व ऍम्बेसेडरचा डामडौल काळाच्या ओघात संपुष्टात आला. पुन्हा आता प्युजोने तरी हा ब्रॅण्ड हिंदुस्थान मोटर्सकडून जरी खरेदी केलेला असला तरी ते उत्पादन पुन्हा हिंदुस्थानात सुरू होईल का, ते तसेच पूर्वीच्या शाही पद्धतीने व एका विशिष्ट इमेजमध्ये बसलेले अॅम्बेसेडरचे रूपडे असेल का असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. तूर्तास तरी त्याचे उत्तर मिळालेले नाही.

१९५७ मध्ये ऍम्बेसेडरचे मार्क-१ हे मॉडेल निघाले होते. मूळ मॉरिस मोटारीच्या दर्शनी रूपात सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर ऍम्बेसेडर मार्क-४ पर्यंत मोटार हिंदुस्थान मोटर्सने उत्पादित केल्या. मग वेगळ्या नावाने म्हणजे नोव्हा, ऑव्हिगो तसेच खास ग्राहकांना पाहिजे त्या पद्धतीच्या मोटारीही बनवल्या गेल्या. कितीही झाले तरी जो अॅम्बेसेडर या मोटारीचा लूक होता तो लोकांच्या मनात कायम होता. त्याचे ते आरेखन फार बदलले गेले नाही.

राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी, अभिनेते, उद्योजक अशा बड्या लोकांना अॅम्बेसेडर या गाडीने भुरळ घातलेली होती यात शंका नाही. कारण त्या आधी परदेशी पद्धतीच्या मोटारी हिंदुस्थानात आणल्या जात होत्या. अगदी पूर्वीच्या हिंदी चित्रपटामध्ये पाहिले तरी शेवर्लेत फोर्ड कंपनीच्या मोटारी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आकार मोठा होता. त्या तुलनेत अॅम्बेसेडर हे रूप खरोखर हिंदुस्थानी रस्ते आणि अन्य बाबींना उपयुक्त असे होते. त्यानंतरच्या काळात अॅम्बेसेडरने मारुती मोटारीचा जन्म होईपर्यंत आपली आब उत्पादनाच्या तुलनेत चांगली राखली होती. प्रीमियर कंपनीची मोटार बंद झाल्यानंतरही अॅम्बेसेडरचे उत्पादन होत होते. मात्र मारुतीनंतर तुलनात्मकदृष्टीने अॅम्बेसेडरची लोकप्रियता कमी झालेली नसली तरी विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. विशेष करून त्यांच्या उत्पादनामधील गुजरातमधील प्रकल्पातून मोटारीचे उत्पादन बंद झाले व अखेर ते केवळ पश्चिम बंगालमध्येच होत होते. कालाय तस्मै नमः. अर्थात असे असले तरी अॅम्बेसेडरविषयी असलेली आत्मीयता आजही कमी झालेली नाही. अनेक अॅम्बेसेडरप्रेमी व त्या मोटारीचा अनुभव घेतलेले अनेक जाणकार अॅम्बेसेडरला विसरू शकलेले नाहीत. पूर्ण हिंदुस्थानी बनावटीची कंपनी असल्याने असणारे सुटे भागही येथेच बनवले जात होते. मुळात अॅम्बेसेडर लोकप्रिय ठरण्याची कारणे त्या मोटारीला मिळालेली राजमान्यता. राजमान्यतेमुळे अॅम्बेसेडर मोटार ही प्रामुख्याने बडय़ा व्यक्तिमत्त्वाशी संबंधित राहिली गेली. त्यामुळे लाल दिवा असणारी वा लाल दिव्यालाही शोभणारी ही मोटार लोकांच्या मनात बसली गेली. त्याचप्रमाणे तिच्यामध्ये असणारी वैशिष्टय़े आजही आवडतील अशीच आहेत यात वाद नाहीत.

एखाद्या सुमो पहलवानासारखी असणारी गोंडस व गुबगुबीत दिसणारी पण तरीही एरो डायनामिक असे आरेखन यामुळे वाऱयाला कापत जाण्याची असणारी रचना, चांगले सस्पेंशन्स, आतील रचनेमध्ये असणारी भरपूर जागा, बसण्यासाठी आरामदायी रचनेच्या आसनव्यवस्थेमुळे मोटार अगदी कोणत्याही रस्त्यावर धावत असली तरी आतील प्रवाशांना मिळणारा आराम शाही होता. पोटातील पाणी हलत नसे इतपत त्याबाबतचा अनुभव काहींना होता. अॅम्बेसेडरची शक्ती हीदेखील चांगल्या दर्जाची होती. सुमारे १५०० सीसीचे इंजिन असे पेट्रोलवर व नंतर डिझेलवरही चालणारे इंजिन ऍम्बेसेडरला वापरले गेले. सुरुवातीला असणारे इंजिन नंतर इसुझू कंपनीचे बसवले गेले. त्यामुळेही विक्रीमध्ये चांगला परिणाम झाला. काही सरकारी विभाग तर मॅटॅडोअरचे इंजिनही बदलून बसवू शकत होते. डिझेलच्या अॅम्बेसेडरलाही लोकांना आकर्षण होते. मूळ पेट्रोलवर सुरू करण्यात आलेली डिझेलचा पर्यायही मिळाल्याने वापरली गेली. हिंदुस्थानी रस्त्यांना साजेशी होती हे मात्र नक्कीच खरे. कारण त्यावेळच्या रस्त्यांची स्थिती लक्षात घेतली तर त्या खडबडीत रस्त्यावर मोटार चालणे व चालवणे तसे कठीण होते. गाडी दणदणीत असणे हे महत्त्वाचे होते. त्याकाळात विशेष करून समुद्र जवळ असणाऱ्या ठिकाणी गाडीचा पत्रा लवकर गंजणारा असल्याचे लक्षात घेऊन तो पत्राही जाड असे. आज अनेक मोटारींच्या कंपन्या प्रक्रिया करून पत्रा देतात तो ही पातळ असतो, पण तोही गंजण्याचे प्रमाण समुद्रानजीकच्या भागांमध्ये कमी नाही. हे सारे लक्षात घेतले तर अॅम्बेसेडरची उपयुक्तता कमी नव्हती. मात्र गाडीचा आकार मोठा असल्याने व शहरांमधील वाहनांचे वाढते प्रमाण, त्यामध्ये होणारी वाहतूककोंडी यावर उपाय म्हणून जेव्हा छोट्या हॅचबॅक मोटारींना जास्त मागणी आली त्यानुसार अॅम्बेसेडरची लोकप्रियता कमी होऊ लागली. अलीकडच्या काळात पुन्हा अॅम्बेसेडरसारख्या सेदान पद्धतीमधील मोटारींना शाही म्हणून वापरले जात आहे, एसयूव्ही वाहनांनाही चांगली मागणी आहे. पण त्यांच्या किमतीही प्रचंड आहेत. पण तितकाच आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारी अॅम्बेसेडर मात्र आता कालबाह्य ठरली गेली. अर्थात काळाप्रमाणे बदल करूनही ती चालली नाही. कारण जागतिक कंपन्याही हिंदुस्थानातील रस्त्यावर आपल्या नवनवीन विविध मॉडेल्सना आणू लागल्या, पण अॅम्बेसेडर मात्र होती तशीच राहिली. कदाचित बदलत्या काळाप्रमाणे अंतर्मन म्हणजे काही तांत्रिकता बदलली असली तरी बाह्य रूप काही त्यांनी बदलले नाही. मार्केटिंगमध्ये कमी पडले वा लोकांना वैविध्यता हवी असल्याने ती देऊ न शकल्याने अॅम्बेसेडर ही हिंदुस्थानी राजमान्यता लाभलेली मोटार बंद पडली गेली. पण तरीही प्युजोने तो ब्रॅण्ड घेतला आहे यात सारे काही महत्त्व आले असेच म्हणावे लागेल. पुन्हा नव्या काळाला अनुसरून काही बदल करून प्युजो कंपनीची अॅम्बेसेडर रस्त्यावर आली तरी नवल वाटायला नको. कारण शेवटी जुने ते सोने हेच खरे.